चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून
By जितेंद्र कालेकर | Published: May 20, 2024 08:04 PM2024-05-20T20:04:37+5:302024-05-20T20:05:22+5:30
डायघर पोलिसांची कामगिरी: आरोपी पतीला अटक
ठाणे: चारित्र्याच्या संशयातून शगुप्ता शेख (४२) या आपल्या पत्नीचा खून करणाऱ्या तारीख शेख (५०) या पतीला अटक केल्याची माहिती डायघर पोलिसांनी सोमवारी दिली. त्याला २४ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
शगुप्ता आणि तारीख यांचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. काही दिवस सुरळीत गेल्यानंतर तारीक याने पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केली. यातूनच त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. तो नेहमीच तिला मारहाण आणि शिवीगाळ करीत होता. १८ मे २०२४ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास भोलेना नगरातील आयशा अपार्टमेंटमधील ष्घरात तारीक याने पत्नीला याच कारणावरुन लाकडी बांबूने मारहाण केली. यात ती बेशुद्ध पडली.
याबाबत त्याने तिचा भाऊ शादाब यालाही माहिती दिली. डायघर पोलिसांनी तिला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले. तिच्या हातावर आणि पायावर तसेच शरीरावर मारहाणीच्या खूणा आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भाऊ शादाब शेख याच्या तक्रारीनंतर पती तारीक याला पोलिसांनी अटक केली.