चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली चाकूने पत्नीची हत्या; विरारच्या वावटेवाडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 02:21 PM2024-09-14T14:21:34+5:302024-09-14T14:28:53+5:30
पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीने चाकूने वार करत हत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. विरारच्या वावटेवाडीतील एकविरा बिल्डिंगमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. विरार पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवून पंचनामा करत शुक्रवारी दुपारी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.
विरारच्या वावटेवाडी येथील एकविरा बिल्डिंग नंबर १६ मध्ये गोपाळ राठोड (३८) हे पत्नी भारती राठोड (३२) परिवारासह राहत होते. आरोपी गोपाळला दारु पिण्याची सवय होती. ती सवय सोडून टाका असे मयत पत्नी भारती ही म्हणत होती. त्या गोष्टीचा आरोपी पतीला राग येत होता. तसेच आरोपी नेहमी पत्नीच्या चारित्राच्या संशयावरुन तिला मारहाण करत होता. त्या भांडणाच्या कारणावरुन आरोपीने शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास मयत पत्नीच्या छातीच्या खाली पोटावर मध्यभागी तसेच पोटावर डावे बाजूला असे दोन ठिकाणी चाकूने वार करुन जखमी करत तिला जिवे ठार मारले. विरार पोलिसांनी आरोपी पतीला कल्याण येथून शुक्रवारी रात्री अटक केले आहे. वसई न्यायालयात आरोपी पतीला हजर केल्यावर १७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी लोकमतला दिली आहे.