आतेभावाच्या मदतीने पतीची हत्या; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:28 AM2019-08-07T02:28:41+5:302019-08-07T02:28:55+5:30

१३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, यापूर्वीही दोनवेळा मारण्याचा प्रयत्न

Husband murder with the help of a relative | आतेभावाच्या मदतीने पतीची हत्या; दोघांना अटक

आतेभावाच्या मदतीने पतीची हत्या; दोघांना अटक

Next

मीरा रोड : आतेभावाशी असलेल्या अनैतिक संबंधातून पतीचा काटा काढणाऱ्या पत्नीसह प्रियकर आतेभावास भाईंदरच्या नवघर पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने दोघाही आरोपींना १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पतीचे परस्त्रीसोबत अनैतिक संबंध आणि दागिन्यांच्या चोरीचा बनावदेखील या दोघांनी रचल्याचे उघड झाले आहे. या आधी दोनवेळा त्यांनी पतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

मीरा रोडच्या रामदेव पार्क भागातील एनजी स्प्रिंग इमारतीत प्रमोद अनंत पाटणकर (४३) हे पत्नी दिप्ती (३६) आणि ९ वर्षांच्या मुलीसोबत राहत होते. १५ जुलै रोजी प्रमोदचे सासरे भानुदास भावेकर यांनी नवघर पोलीस ठाण्यात आपले जावई घरात मृतावस्थेत पडले असल्याचे कळवले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय होता. परंतु प्रमोदच्या मान, गळा, छातीवर निळसर व्रण, तसेच नाकातून रक्त येत असल्याने त्यांच्या हत्येची शक्यता वाटू लागली.

सहायक पोलीस निरीक्षक साहेब पोटे आणि पोलीस नाईक रवींद्र भालेराव यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता बेडवर गर्भनिरोधकची पाकिटे, चहाच्या कपावर लिपस्टीकची वेडीवाकडी छाप, तसेच कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. घरातून सोन्याची चेन, पेंडल, प्रमोद यांचा मोबाइल आणि २ हजार रोख असा ऐवज चोरीस गेला होता. कपावरील लिपस्टीकची वेडीवाकडी छाप निरखून पाहिली असता ती महिलेची नसल्याचे जाणवले.

प्रमोदचे परस्त्रीशी अनैतिक संबंध होते व त्यातूनच हत्या झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. परंतु पोलिसांना प्रमोदचे भाऊ व आई, वडिलांकडून दिप्तीचे तिचा आतेभाऊ समाधान उद्धव पाषाणकर (४०, रा. पाषाण, पुणे) याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले.
प्रमोदच्या नातलगांनी दिप्ती आणि समाधान यांनी हत्या केल्याचा संशय वर्तवला. रखवालदारासह शेजारी राहणारे अमोल डुमणे यांनीदेखील सकाळी समाधान हा घरी आल्याचे व दिप्तीने त्याला दार उघडून आत घेतल्याचे सांगितले. त्यातूनच पोलिसांनी पत्नी दिप्ती व समाधानची चौकशी केली. मोबाईलचे लोकेशन, तसेच खबरी व अन्य तांत्रिक विश्लेषणावरुन पोलिसांनी दिप्तीसह समाधान याला अटक केली.

प्रमोद हा एलआयसीमध्ये, तर दिप्ती मुंबईच्या एका शाळेत लिपीक म्हणून नोकरी करते. दोघांचे लग्न २००७ साली झाले होते. समाधानला पत्नी व दोन मुली आहेत. समाधान हा पुण्यात बजाज फायनान्समध्ये वसुली अधिकारी आहे. २०१४ पासून दिप्ती आणि समाधानचे अनैतिक संबंध होते. प्रमोदला याची कुणकुण लागल्याने त्यावरुन वाद सुरु होता. त्यातूनच दिप्ती व समाधान यांनी प्रमोदचा कायमचा काटा काढायचे ठरवले. झोपेच्या गोळ्या देवून प्रमोदला मारायचे त्यांनी ठरवले. त्यानुसार दोनवेळा प्रमोदला चहामधून झोपेच्या १० गोळ्या दिल्या होत्या. पण त्याचा प्रमोदवर परिणाम न झाल्याने दोघांचा डाव हुकला.

चहामध्ये टाकल्या झोपेच्या २० गोळ्या
१४ जुलै रोजी दिप्तीने मुलीला गोल्डन नेस्ट भागात राहणाºया आपल्या आई-वडिलांच्या घरी सोडले. १५ जुलै रोजी सकाळी सव्वासातच्यादरम्यान प्रमोदसाठी चहा बनवून त्यामध्ये झोपेच्या २० गोळ्या टाकल्या. त्याचा परिणाम होऊन प्रमोदची शुध्द हरपली.
त्यावेळी बाहेरच दबा धरुन बसलेल्या समाधानला घरात बोलावले. समाधानने प्रमोदच्या गळ्यावर उशी ठेऊन कापडी दोरीने गळा आवळला. त्यानंतर नाक आणि तोंडावर उशी दाबून दोघांनी त्याची हत्या केली. हत्या केल्यावर दिप्ती कामाला जायचे म्हणून निघून गेली. .
समाधानने उशीखाली गर्भनिरोधकाची पाकीटं ठेवली. चहाचा आणखी एक कप ठेवत स्वत:च्या ओठाला लिपस्टीक लावून त्याचा ठसा कपावर उमटवला. कपाटातील ऐवज घेऊन समाधान निघून गेला. आरोपींना पकडण्यात अन्य अधिकाऱ्यांनीही सहकार्य केले.

Web Title: Husband murder with the help of a relative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून