हटके स्टोरी - जलसंवर्धन अभियानाला अध्यात्माची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 11:36 PM2020-02-15T23:36:30+5:302020-02-15T23:36:44+5:30
पाड्यांमध्ये पाणीपुरवठा। पालेभाज्यांचे घेतात उत्पादन
पंकज पाटील
बदलापूर : शहापूर तालुका हा मुंबईची तहान भागवणारा तालुका असला, तरी त्या तालुक्यातील ग्रामस्थ हे पाण्यासाठी भटकंती करतात. या समस्येवर तोडगा काढण्यात सरकारलाही अपयश आले आहे. मात्र, आता शहापूर तालुक्यातील अध्यात्मिक गुरूंनी या तालुक्याला पाणीदार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जलसंवर्धन मोहिमेला अध्यात्माची जोड दिल्याने शहापूर तालुक्यातील आष्टी आणि परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला. आता उन्हाळ्यातही ग्रामस्थ पालेभाज्यांचे उत्पादन घेत आहेत.
चांगले काम हीच परमेश्वराची प्रार्थना, हा अध्यात्म विचारांचा मूळ गाभा प्रत्यक्षात आणत शहापूर तालुक्यातील सत्संग परिवाराने परिसरातील शेकडो गावपाड्यांच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई दूर करण्याचा निर्धार केला. शहापूरमधील टाकीपठार येथील फुलनाथबाबा यांचे हजारो शिष्यगण आहेत. आपल्या भोवतालची परिस्थिती बदलायची असेल, तर त्याची सुरुवात स्वत:पासून करायला हवी, या भावनेने यंदा फुलनाथबाबा यांनी स्वत: त्यांच्या शिष्यांसोबत डिसेंबरपासून ओढ्यातील गाळउपसा मोहीम सुरू केली. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी लागणारा खर्च भक्तांनी दिलेली वर्गणी, देणगी आणि मठातील निधीतून भागवला जातो. लोकसहभागाच्या माध्यमातून येणाऱ्या यंत्रणेचा वापर करून ते काम अविरतपणे सुरू आहे. स्वत: फुलनाथबाबा या कामावर लक्ष ठेवून आहेत.
खरेतर, तालुक्यातील सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठी मुसोई, आडिवलीसारखी छोटी धरणे, पाझर तलाव आहेत. याशिवाय, सरकारने नैसर्गिक ओढे, नाले आणि नद्याांवर बंधारे बांधले आहेत. मात्र, देखभाल-दुरुस्तीअभावी बहुतेक बंधाऱ्यांचा जलसंचयनासाठी उपयोग होत नाही. त्यामुळे सत्संग परिवाराने तहसीलदार, वनविभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेऊन त्यांनी विविध नाले तसेच नदीपात्रातील गाळ काढण्याची मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत भर्डेपाडा, भोईपाडा, चिखलगाव, मानेखिंड, अष्टे, वेहळोली मुका ओहोळ आदी ठिकाणचा गाळ उपसून झाला आहे. या मोहिमेत काम करणाºया सर्व कामगारांना रोज मजुरी दिली जाते. याव्यतिरिक्त सकाळी नाश्ता, पिण्याचे पाणी, दुपारचे जेवण मठावरून कामाच्या ठिकाणी पाठवले जाते. तालुक्यातील शिष्यगण आपले काम सांभाळून या मोहिमेला हातभार लावत आहे.
पाऊस पडेपर्यंत सुरू राहणार मोहीम
पाऊस पडेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे फुलनाथबाबा यांनी सांगितले. फुलनाथबाबा हे स्वत: कृषी सहायक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या अनुभवाचा फायदा या मोहिमेला होत आहे.