झोपडीधारकांचा पालिकेवर मोर्चा
By admin | Published: May 6, 2017 05:44 AM2017-05-06T05:44:50+5:302017-05-06T05:45:32+5:30
भाजपा नगरसेवकाने झोपडीधारकांच्या विविध मागण्यांसह पालिकेने राजकीय दबावाखाली झोपड्यांवर सुरू केलेली कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : भाजपा नगरसेवकाने झोपडीधारकांच्या विविध मागण्यांसह पालिकेने राजकीय दबावाखाली झोपड्यांवर सुरू केलेली कारवाई थांबवण्यासाठी शुक्रवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला.
पालिकेने शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यात काशीगाव येथील दाचकुलपाडा, मीनाक्षीनगर, माशाचापाडा आदी भागांतील बेकायदा झोपड्यांचा समावेश आहे. या झोपड्या काही स्थानिक राजकीय मंडळींकडूनच वसवण्यात येत असल्याने पालिकेतील काही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात.
काही वर्षांपूर्वी याच परिसरातील हजारो बेकायदा झोपड्यांवर पालिकेने केलेल्या कारवाईप्रकरणी त्या वेळचे भाजपा पदाधिकारी व नगरसेवक अनिल भोसले यांच्यासह काही व्यक्तींवर काशिमीरा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यंदाही बेकायदा झोपड्यांवर पालिका राजकीय दबावापोटी कारवाई करत असल्याचा आरोप भोसले यांनी केला. या वेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर थेट आरोप करून त्यांच्याच दबावामुळे पालिका झोपड्यांवर कारवाई करत असल्याचा दावा केला आहे. राजकीय दबावापोटी झोपड्यांवर होणारी कारवाई प्रशासनाने त्वरित थांबवावी. तसेच येथील अनेक घरांना पाण्याची सोय नसल्याने स्थानिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्याचप्रमाणे परिसरात रस्त्यांची सोय नाही. बीएसयूपीची योजना रखडली असून ती त्वरित पूर्ण करून नागरिकांना घरे द्यावीत. येथील आदिवासीपाड्यात दवाखान्याची सोय नसल्याने रुग्णांना पायपीट करून शहरात यावे लागते.
या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून प्रशासन केवळ झोपड्यांनाच लक्ष्य करीत असल्याचा आरोप भोसले यांनी केला. कारवाई थांबवून प्रशासनाने तेथील रहिवाशांना पायाभूत सुविधा लवकरात लवकर पुरवाव्यात, या मागणीचे निवेदन आयुक्त डॉ. नरेश गीते यांना दिले. त्यावर, आयुक्तांनी पालिका दबावाखाली कारवाई करीत नसून सर्वच बेकायदा बांधकामांवर कारवाई करीत आहे. झोपड्यांबाबत आदेश मिळाल्यानंतरच कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.
भोसले यांची राजकीय स्टंटबाजी
अनिल भोसले यांच्या आरोपाचे खंडन करताना शिवसेनेचे उपशहरप्रमुख शंकर वीरकर म्हणाले, नगरसेवक भोसले यांनी थेट आमदार प्रताप सरनाईक यांचा कारवाईशी संबंध लावला असून त्यांची ती राजकीय स्टंटबाजी आहे. स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासह आपला राजकीय भाव वाढवण्यासाठी ते केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.