हायड्रोलिक मशीन कोसळल्याने मजूर ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 01:22 AM2019-11-15T01:22:16+5:302019-11-15T01:22:19+5:30
गोदामाच्या दुसऱ्या माळ्यावरून हायड्रोलिक प्रेस मशीन कोसळल्याने एक मजूर जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना पिंपळास येथील औद्योगिक वसाहतीत बुधवारी रात्री घडली.
भिवंडी : विविध साहित्याच्या पॅकिंगसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या गोदामाच्या दुसऱ्या माळ्यावरून हायड्रोलिक प्रेस मशीन कोसळल्याने एक मजूर जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना पिंपळास येथील औद्योगिक वसाहतीत बुधवारी रात्री घडली. विपिन पासवान (३०) हे ठार झालेल्या मजुराचे, तर जमील अली हुसेन अन्सारी (३२, रा. पिराणीपाडा) हे जखमी मजुराचे नाव आहे. हे दोन्ही मजूर मौजे पिंपळास येथील औद्योगिक वसाहतीमधील एफ-४, बिल्डिंग नं. १०१ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या गोदामात विविध साहित्याच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी हायड्रोलिक प्रेस मशीन बुुधवारी रात्री दुसºया माळ्यावर चढवत होते.
ही अवजड मशीन चढवण्याचे काम सुरू असताना अचानकपणे मशीनसह दोन्ही मजूर ३० फूट उंचावरून कोसळले. त्यावेळी हायड्रोलिक मशीन या दोघा मजुरांच्या अंगावर कोसळल्याने विपिन पासवान हा जागीच ठार झाला, तर जमील अली हा गंभीर जखमी झाला. तो बेशुद्ध असून, माणकोली येथील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये मजूर ठेकेदाराचा दोष असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार कोनगाव पोलीस ठाण्यात मजूर ठेकेदार मयूर दशरथ पाटील (३०, रा. पिंपळास) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार करीत आहेत.