‘मैं भी चौकीदार’ला भाजप नगरसेवकांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:38 AM2019-04-01T05:38:02+5:302019-04-01T05:38:20+5:30
असंतोष कायम : नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
ठाणे : ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशभरातील ५०० पैकी मुंबईसह मोजक्याच ठिकाणच्या कार्यकर्त्यांना मोदी यांच्याशी दुहेरी संवाद साधण्याची रविवारी संधी मिळाली. कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी यावेळी मोकळेपणाने उत्तरेही दिली; मात्र या कार्यक्रमाला भाजपाच्या बहुतांश नाराज नगरसेवकांनी मारलेली दांडी चर्चेचा विषय होती.
ठाणे महापालिका भवनाजवळील ज्ञानराज सभागृहात ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६.३० वा.च्या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित केला होता. पंतप्रधानांनी थेट दिल्ली येथून यावेळी संवाद साधला. महाराष्टÑातील मुंबई तसेच ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि राजस्थान अशा मोजक्याच राज्यांतील सात ते आठ कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोदी यांच्याशी संवाद साधला. आपली शक्ती तपासण्यासाठी अंतरिक्षयानाचीही चाचणी घेण्यात आली, यात गैर काहीच नाही. बड्या भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगाच्या दारापर्यंत आणले आहे. यापुढे त्यांना तुरुंगात घातले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
दीड तास रंगलेल्या या संवादाच्या कार्यक्रमात आपण कसा विकास केला, यावरच त्यांनी भर दिला. यावेळी भाजपाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर, शहराध्यक्ष संदीप लेले, शिवसेना खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाणे लोकसभा) नरेश म्हस्के आदी उपस्थित होते.
नाराजी नसल्याचा दावा
च्या कार्यक्रमाला भाजपच्या २३ पैकी गटनेते अशोक राऊळ, नारायण पवार, संजय वाघुले, सुनेश जोशी, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, प्रतिभा मढवी, नंदा पाटील, दीपा गावंड, स्रेहा आंब्रे, नम्रता कोळी अशा मोजक्याच नगरसेवकांनी हजेरी लावली. इतरांनी दांडी मारल्याने तर्कवितर्क काढले जात होते.
च्युती झाल्याने आता हे किरकोळ विषय मागे पडल्याचा दावा एका भाजप पदाधिकाऱ्याने केला. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या पातळीवरच नगरसेवकांच्या नाराजीचा विषय मिटला असल्याचा दावा अॅड. संदीप लेले यांनी केला.