मी आज आणि उद्याही कार्यकर्ता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By अजित मांडके | Published: February 24, 2024 11:01 PM2024-02-24T23:01:13+5:302024-02-24T23:02:20+5:30
ठाणे येथील रेमंड मैदानात युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुख्यमंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता आजही जिवंत ठेवला आहे आणि उद्याही मी कार्यकर्ता राहणार आहे, असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तर प्रत्येक युवा सैनिक हा मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या शिवसेनेला वाचविण्यासाठी धाडस करून पाऊल उचलले. चूकीचे पाऊल उचलले असते तर इतके लोक सोबत आले नसते, असेही ते म्हणाले.
ठाणे येथील रेमंड मैदानात युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि चित्रकार शशिकांत धोत्रे यांना शिवगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
घरावर तुळशीपत्र ठेवायची वेळ तरुणांवर येणार नसून त्यांना नोकरीचे पत्र मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सैनिकांना दिले.बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभर शिवसेना शाखांचे जाळे विणले. या शाखा लोकांना न्यायमंदिर वाटेल असे आपण काम करायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक घरगडी समजतात. परंतु आता पक्षाचा कोणीही मालक नाही आणि नोकरही नाही. सर्व जण कार्यकर्ते आहेत. कोणी मोठा आणि छोटा नाही. शिवसेना पुढे न्यायची आहे. ८० टक्के समाज कारण आणि २० टक्के राजकारण याप्रमाणे काम करायचे आहे, असेही ते म्हणाले.