"मी एकनाथ संभाजी शिंदे..."; सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री, एक विलक्षण प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 12:09 PM2022-07-01T12:09:01+5:302022-07-01T12:09:28+5:30

डोळ्यादेखत पाण्यात मुले बुडाली, तेव्हा सोडले होते राजकारण...

I am Eknath Sambhaji Shinde From ordinary Shiv Sainik to CM a fantastic journey | "मी एकनाथ संभाजी शिंदे..."; सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री, एक विलक्षण प्रवास

"मी एकनाथ संभाजी शिंदे..."; सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री, एक विलक्षण प्रवास

googlenewsNext

ठाणे  : घरची गरीब परिस्थिती... रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना ‘शिवसेना’ या चार अक्षरांशी जोडले गेलेले एकनाथ शिंदे हे आता राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचा हा राजकीय प्रवास अतिशय खडतर, नानाविध संकटे व आव्हाने यांनी भरलेली मालिका आहे. शिवसेनेचे चौथे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना लाभला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांची वाटचाल शक्य झाली आहे. बघूया त्यांचा जीवनप्रवास...

असे बनले जनतेचे नेते -
शिंदे यांचा जन्म अहिर येथे (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) ६ मार्च १९६४ रोजी झाला. परंतु त्यांची कार्यभूमी ठाणेच राहिली. शिंदे यांनी १९९७ साली महापालिकेची निवडणूक लढवली व ते नगरसेवक झाले. शिंदे यांच्या जीवनात अचानक एका अपघातामुळे मोठा आघात झाला. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या शिंदे यांच्या मनाला उभारी देण्याकरिता आनंद दिघे यांनी २००१ मध्ये त्यांची सभागृहनेतेपदी निवड केली. या पदावर त्यांनी तीन वर्षे उत्तम काम करुन आपल्यातील नेतृत्व गुणांची चमक दाखवली. ठाणे जिल्हा पिंजून काढला. २००४ साली त्यांनी पहिल्यांदा ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढविली व निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेने त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. जिल्हाप्रमुख व आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच नेते होते. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये शिंदे यांनी भाग घेतला. गरजवंतांना स्वस्तात धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी केलेले आंदोलन, टंचाईच्या काळात नागरिकांना पामतेल उपलब्ध करुन देणे, नागरिकांच्या समस्यांसाठी प्रशासनाच्या विरोधात अनेक आंदोलने केल्याने शिंदे जनतेचे नेते बनले. २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या विजय झाला. २०१४ मध्ये ते विरोधी पक्षनेतेही झाले.

विधिमंडळातील कामगिरी -
२००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला, ठाण्यातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा जटिल प्रश्न सोडवण्याकरिता ठाणेकरांच्या जिव्हाळ्याची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, मेट्रो, नवीन ठाणे स्थानक, पोलीस दलाचे आधुनिकीकरण अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला व सत्ता प्राप्त होताच समस्यांवर मात केली.

एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन -
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी निर्मिती करण्यात आलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) पुढे आर्थिक आव्हान उभे राहिले होते. मृत्युशय्येवर असलेल्या या विभागाला पुनरुज्जीवित करण्याचे काम शिंदे यांनी केले. समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अल्पावधीत केलेली प्रभावी अंमलबजावणी बघून विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर या एमएमआरडीएकडे असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर देण्यात आली.

आरोग्यमंत्री म्हणून पाडली छाप -
२०१९ मध्ये शिंदे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी आली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले.

सीमाप्रश्नावरून भोगला तुरुंगवास -
अनेक आक्रमक आंदोलनांमुळे शिंदे यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. एवढेच नाही तर १९८६ मध्ये सीमाप्रश्नावरून झालेल्या आंदोलनात शिंदे यांनी आक्रमकपणे भाग घेतला होता. या आंदोलनामुळे शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी शिंदे हे ४० दिवस बेल्लारी तुरुंगात होते.

डोळ्यादेखत पाण्यात मुले बुडाली, तेव्हा सोडले होते राजकारण -
२ जून २००० रोजी एकनाथ शिंदे त्यांचा ११ वर्षांचा मुलगा दिपेश आणि ७ वर्षांची मुलगी शुभदा यांना घेऊन सातारा येथे गेले होते. बोटिंग करत असताना अपघात झाला आणि दोन्ही मुले डोळ्यासमोर बुडाली. त्यावेळी शिंदे यांचे तिसरे अपत्य श्रीकांत अवघे १४ वर्षांचे होते. एका मुलाखतीत या वेदनादायक घटनेची आठवण करून देताना शिंदे म्हणाले होते, “तो माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता. मी पूर्णपणे तुटलो होतो. मी सर्वकाही सोडण्याचा निर्णय घेतला, राजकारणही.” या घटनेला आता २२ वर्षे झाली आहेत. त्यावेळी शिंदे यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा आनंद दिघे यांनीच त्यांना परत आणले.

मुलाला केले डॉक्टर, नंतर खासदार -
परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले, तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. श्रीकांत एकनाथ शिंदे हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
 

Web Title: I am Eknath Sambhaji Shinde From ordinary Shiv Sainik to CM a fantastic journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.