कल्याण ग्रामिणचा शिवसेनेचा आमदार मीच : सुभाष भोईर यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 06:23 PM2018-03-29T18:23:02+5:302018-03-29T18:23:02+5:30
राजकारणात मोठमोठ्या पदांवर जायला अनेक जण ईच्छूक असतात, पण कल्याण ग्रामिण मतदारसंघाचा शिवसेनेचा आमदार मीच असून यापुढेही इथूनच आमदारकी लढवणार आहे. तिकिटांसाठी ईच्छूक कोणीही असला तरी मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर पक्ष माझाच विचार करेल यात संदेह नाही असा दावा आमदार सुभाष भोईर यांनी केला. भोईर यांनी त्यांच्या विकासकामांचा साडेतीन वर्षांचे प्रगति पुस्तक मांडण्यासाठी आणि त्यांच्या नव्याने होत असलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या शुभारंभासंदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
डोंबिवली: राजकारणात मोठमोठ्या पदांवर जायला अनेक जण ईच्छूक असतात, पण कल्याण ग्रामिण मतदारसंघाचा शिवसेनेचा आमदार मीच असून यापुढेही इथूनच आमदारकी लढवणार आहे. तिकिटांसाठी ईच्छूक कोणीही असला तरी मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर पक्ष माझाच विचार करेल यात संदेह नाही असा दावा आमदार सुभाष भोईर यांनी केला.
भोईर यांनी त्यांच्या विकासकामांचा साडेतीन वर्षांचे प्रगति पुस्तक मांडण्यासाठी आणि त्यांच्या नव्याने होत असलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या शुभारंभासंदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ७५१ कोटींची विकासकामे त्यांनी गेल्या साडेतीन वर्षात केली असून आगामी काळात आणखी कोट्यवधींची विकास कामे होत असल्याचे ते म्हणाले. विकास कामांसंदर्भात माहिती देतांना त्यांनी रस्ते, वीज वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर यांसह पाणी पुरवठा, शीळ भागात एलीव्हेटेड पूल, यासह अंतर्गत रस्ते, स्वच्छता आदी विविध कामांबाबत माहिती दिली. शाळांमध्ये संगणक देणे यासह अन्य विविध कामांबाबत त्यांनी माहिती देत आमदार म्हणुन सगळी कामे केल्याचे म्हंटले. एवढा कोट्यवधींचा निधी या आधी कोणी आणला नाही, आणु शकणार नाही असा दावा त्यांनी केला.
त्यावर हे कोट्यवधींचे आकडे जरी सांगण्यात येत असले तरी विकासकाम दिसत नसून कल्याण ग्रामिणमध्ये भकास जास्त असल्याचे पत्रकारांनी विचारले. त्यावर काम सुरु असून टप्प्याटप्याने ते दिसतील. तसेच साडेतीन वर्षात स्वत:चे जनसंपर्क कार्यालय का केले गेले नाही यावर भोईर म्हणाले की, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे १३ प्रभाग तसेच २७ गावांमधील काही गावे, तर खिडकाळीनंतर शीळपर्यंतच्या काहीभागात ठाणे महापालिकेची हद्द अशा विविध भागांमध्ये माझी आमदारकी आहे. त्या सर्व ठिकाणी न्याय द्यावा लागतो. त्यातही डोंबिवलीत नांदिवली, पीअँडटी कॉलनीत रवी म्हात्रे यांच्या दालनात मी जनसंपर्क कार्यालय ठेवल्याचे सर्वश्रुत आहे. पण असे असतांनाही आता मात्र नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून त्यांना भेटावे लागते म्हणुन सगळयांना मध्यवर्ती अशा अधिकृत जागेच्या शोधात असतांनाच ती मिळण्यास विलंब झाला, आता ती मिळाली असून १ एप्रिल रोजी त्याचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात येणार असून त्याला खासदार श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.
सत्तेत असूनही पाण्याच्या प्रश्नासाठी सातत्याने मंत्रालयाच्या पाय-यांवर आपणास आंदोलन करावे लागते हे कितपत योग्य आहे असे विचारल्यावर ते म्हणाले की, नागरिकांच्या प्रश्नासाठी काहीही करणार. आंदोलन करावी लागली तरी ते करणारच, पण आता २७ गावांसह अन्य ठिकाणचा पाण्याचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून लवकरच तो मार्गी लागणार आहे. त्यासाठी ३ एप्रिल रोजी उद्योग मंत्र्यांच्या दालनात दुपारी दोन वाजता महत्वाची बैठक असून त्यासाठी महापालिका, एमआयडीसीसह अन्य सर्व अधिकारी पालकमंत्री उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.
२७ गावांचा विकासही महापालिकेतच राहून होणार असल्याने त्यांची स्वतंत्र नगरपालिका होऊ नये असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. त्या गावांमधील २१ नगरसेवकांनीही नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महापालिकेतच राहण्यात स्वारस्य असल्याचे एकीवात आले. त्यामुळे त्यांनाही विकास हवा असून वेगळी नगरपालिका नको असे ते म्हणाले. संघर्ष समितीचा मुद्दा आल्यावर मात्र नेते प्रकाश म्हात्रे यांनी केवळ प्रसिद्धीसाठी संघर्ष समिती कर नाही देणार असे म्हणते, प्रत्यक्षात त्यांच्या समवेत आहे तरी कोण असा सवाल करत महापालिकेतच राहणे हे नागरिकांसह सगळयांच्या भल्याचे असल्याचे सांगितले. पाण्याचे असमान वितरण आणि अनधिकृत नळजोडणी यामुळे ग्रामिणमध्ये पाण्याची समस्या तीव्र आहे, त्यातच १६० कोटींची अमृत योजना आता आली असून त्या अंतर्गत आधी पाईपलाइन चांगली-मोठी असणे आवश्यक असून जुन्या लाईन तातडीने काढव्यात. महापालिकेकडे निधी नव्हता तो आता येणार असून त्यासाठीचे टेंडर काढले आहे, आगामी सहा महिन्यात वर्षभरात या भागातील पाणी समस्या मार्गी लागेल असेही ते म्हणाले. त्यामुळे शिवसेनेचच्या कामाबद्दल आम्ही समाधानी असल्याचे म्हात्रे म्हणाले.
कल्याण शीळ मार्गावर काटई ते टाटा लाईन या महामार्गावर पथदिवे बंद असतात त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असून वाहनचालकांची गैरसोय होते. ते गंभीर असून तसे जर बार चालकांमुळे होत असेल तर अशांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी पाठपुरावा करणार असून पथदिवे सुरु राहण्यासाठी एमएसआरडीसीशी पत्रव्यवहार करणार असल्याचे भोईर म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६५०० कोटींची विकास कामे करणार असल्याचे सांगितले होते,त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाच विचारा असे सांगत भोईर म्हणाले की, मी मात्र ७५१ कोटींची कामे शिवसेनेच्या माध्यमाने केली असून त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सहकार्य मिळाले आहे. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर आहे, त्यात गुन्हे दाखल करुन कारवाई का केली जात नाही, महापालिका त्याला सर्वस्वी जबाबदार असल्याचे ते म्हणाले. एमआयडीसीमधील कारखाने स्थलांतराचा मुद्दा उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे सुरु असून त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. तसेच भविष्यात प्रोबेस सारखी दुर्घटना घडू नये यासाठी विशेष प्रयत्न सुरु असून त्या स्फोटात नागरिकांचे जे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाईसाठी ३ एप्रिलच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, एकनाथ पाटील, बंडू पाटील, प्रकाश म्हात्रे, रवी म्हात्रे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.