तुमच्या टाळ््यांची मला सवय नाही : श्रीगौरी सावंत यांनी ठाण्यात व्यक्त केल्या भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 05:20 PM2019-12-15T17:20:56+5:302019-12-15T17:23:13+5:30
आम्हाला शिक्षणात सामावून घ्या अशा भावना श्रीगौरी सावंत यांनी ठाण्यात व्यक्त केल्या.
ठाणे : माझ्या टाळीत आक्रोश आहे आणि तुमच्या टाळीत प्रेम, कौतुक आहे आणि या टाळ्यांची मला सवय नाही अशा भावना श्रीगौरी सावंत यांनी प्रेक्षकांतून आलेल्या टाळ््यांना उत्तर देत व्यक्त केल्या. शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांनी पुलिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग शिकवतात. पण कधी त्यांना नपुसकलिंगचा अर्थ समजावून सांगितला आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गुरूवर्य स. वि. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचे दुसरे आणि शेवटचे पुष्प तृतीयपंथी श्रीगौरी सावंत यांनी गुंफले. मला काही सांगायचं आहे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रदिप ढवळ आणि प्रा. पल्लवी देशपांडे यांनी या विषयावर त्यांची मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. त्या पुढे म्हणाल्या, शाळेने, शिक्षणाने माझे खुप नुकसान केले कारण त्यांनी मला माझी ओळखच दिली नाही. आम्हाला हिजडा का म्हणतात हे तुम्हा लोकांना सांगितले नाही आणि त्याचा त्रास आज आम्ही सगळे तृतीयपंथी भोगत आहोत. मला समजून घेणारे कोणी नव्हते आणि याचा त्रास मला आणि माझ्या पालकांना होत होता. जसे, वर्गात विद्यार्थी, विद्यार्थीनींना समान वागणूक दिली जाते तशी वागणूक तृतीयपंथी विद्यार्थ्याला पण दिली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लैंगिकता ही स्थिर नाही, ती एका बॉक्समध्ये बसणारी नाही. ती कोणत्याही टप्प्यावर उलगडू शकते, तुम्ही काय आहात हे जाणवते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. माझ्या आई वडिलांनी मला दूर केले कारण समाजाची त्यांनी भिती होती आणि म्हणूनचअशा अनेक गौरी घरापासून दूर आहेत. आम्ही समाजापासून वेगळी नाही आम्हाला सक्षम करा. आम्हाला शाळेत सामावून घेतले असते तर आज ही आमची परिस्थीती नसती. स्वत:च्या जेंडरचा आपण आदर करतोय का असा प्रश्न उपस्थित करीत श्रीगौरी सावंत म्हणाल्या की, आज महिला - पुरूषांचे इतके प्रश्न आहेत त्या दोघांच्या भांडणात आम्ही तृतीयपंथी कुठे आहोत? माणसाने माणसासारखे जगावे हीच आमची अपेक्षा आहे. आम्हाला भीक मागायला समाज लावतोय, आम्हाला काम द्या. जसा मुर्तीकार मुर्तीला आकार देतो तसा मी माझ्या शरिराला आकार दिलाय, समाजाला आम्हाला स्वीकारायला त्रास का होतोय. किती वर्षे आम्ही टाळ््या वाजवायच्या? माझ्या सारख्या गौरी मला रस्त्यावर पाहायच्या नाही. जेव्हा शाळांमध्ये समान लैंगिकतेचे धडे दिले जातील तेव्हा हे चित्र बदलेल. तुम्ही जेव्हा आम्हाला स्वीकारायला शिकवाल तेव्हा तुमच्या आणि आमच्यातली दरी दूर होईल. यावेळी श्रीगौरी सावंत यांनी महाराष्ट्रात तृतीयपंथींसाठी कल्याणकारी बोर्ड असावा अशी सरकारडे अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे, खजिनदार सतिश सेठ आदी उपस्थित होते.