ते कुठल्या रस्त्याबद्दल बोलताहेत हे मला माहीत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:44 AM2021-08-19T04:44:20+5:302021-08-19T04:44:20+5:30
कल्याण : ‘ते कुठल्या रस्त्याबद्दल बोलताहेत हे मला माहिती नाही. ते त्यांच्या मतदारसंघाविषयी बोलत आहेत का’, असा प्रतिप्रश्न विचारत ...
कल्याण : ‘ते कुठल्या रस्त्याबद्दल बोलताहेत हे मला माहिती नाही. ते त्यांच्या मतदारसंघाविषयी बोलत आहेत का’, असा प्रतिप्रश्न विचारत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘माझ्या मतदारसंघात कल्याण-शीळ रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. आताच कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांसाठी ३६० कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. अंबरनाथ, उल्हासनगरातही विकासकामे सुरू आहेत. मला वाटते एखादे धीम्या गतीने सुरू असलेले काम जलद गतीने करून घेण्याचे काम लोकप्रतिनिधींचे असते.’
१६ ऑगस्टला कल्याण-शीळ रस्त्यावरून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली. त्यावेळी त्या रस्त्याच्या कामाविषयी पत्रकारांनी पाटील यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी कल्याण-शीळ रस्त्याचे काम निकृष्ट झाले असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल. ठाणे जिल्ह्यातील कुठलेच काम वेळेत पूर्ण केले जात नाही. ‘बोगस ठेकेदारीचा ठाणे जिल्ह्याला शाप आहे’, अशी खळबळनजक टीका पाटील यांनी केली होती. त्याला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, शिंदे यांनी बुधवारी डोंबिवलीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे, दीपेश म्हात्रे, महेश गायकवाड, मनोज चौधरी, विश्वनाथ राणे आदी उपस्थित होते.
‘वर्षाखेर पाचव्या-सहाव्या रेल्वेची लाइन सुरू होणार’
दिवा-ठाणेदरम्यान रेल्वेची पाचवी आणि सहावी रेल्वे लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम वर्षाखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे उपनगरी प्रवासी रेल्वे गाड्यांच्या ५० फेऱ्या वाढणार आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.
------------------------------