शिक्षकाची नोकरी नको रे बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:46 AM2021-09-15T04:46:18+5:302021-09-15T04:46:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : खूप वर्षांपूर्वी चांगली आणि सुरक्षित समजली जाणारी नोकरी म्हणजेच शिक्षकाची, पण गेल्या काही वर्षांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : खूप वर्षांपूर्वी चांगली आणि सुरक्षित समजली जाणारी नोकरी म्हणजेच शिक्षकाची, पण गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची मोठ्या प्रमाणात भरती न झाल्याने शिक्षक होण्याकडे विद्यार्थ्यांचा असलेला कल बराचसा कमी झालेला आहे. डीएडचा कोर्स करूनही नोकऱ्या नसल्याने शिक्षकाची नोकरी नको रे बाबा... त्यापेक्षा एखादी छोटी मोठी नोकरी परवडेल, असेच तरुण वर्गाचे मत दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातील डीएड महाविद्यालयात कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे.
पूर्वीच्या काळी डीएड किंवा बीएड करून शिक्षक होण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्न करायचे. तशा त्यांना नोकऱ्याही उपलब्ध होत होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत शिक्षकांची मोठ्या संख्येने भरती निघालेली नाही, त्यामुळे आधीच डीएड करून बसलेले तरुण आज बेरोजगार आहेत किंवा मिळेल ती छोटी-मोठी नोकरी करताना दिसतात. त्यातच गेल्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे शाळा ऑनलाइन सुरू आहेत. परिणामी, काही शाळांमध्ये असलेल्या सर्व शिक्षकांनाही दररोज काम असतेच असे नाही. काहींच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. त्यात मग शिक्षकांची नवीन भरती कुठून होणार, असे अनेक प्रश्न आहेत.
शिक्षक भरतीसाठी जागा निघत नसल्याने डीएड करायला अनेक तरुण नापसंती दर्शवितात. त्यामुळे ठाण्यातील डीएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही कमी होत चालली आहे. ठाण्यात २० डीएड महाविद्यालये कार्यरत असून, त्यात सध्या ५५० ते ६०० विद्यार्थीच शिक्षण घेत आहेत. यंदा मात्र, नवीन प्रवेशासाठी आतापर्यंत सुमारे ४७० अर्ज आले आहेत.
---------
जिल्ह्यातील डीएड महाविद्यालये - २०
सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी - ५५० ते ६००
यंदा आलेले नवीन प्रवेशासाठीचे अर्ज - ४७०
------
पाच ते सहा वर्षांपूर्वी डीएड केलेल्या माझ्या बहिणीला अद्यापही चांगली नोकरी मिळालेली नाही. मध्ये एका ठिकाणी तात्पुरती नोकरी मिळाली होती. मात्र, सध्या ती बेरोजगारच आहे. मलाही डीएड करायची खूप इच्छा होती आणि आवडही होती, परंतु शिक्षकाच्या नोकरीसाठी भरतीच निघत नसल्याने दुसऱ्या कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे.
- राही संबेळ, विद्यार्थिनी.
--------
डीएडचा कोर्स करून शिक्षकाची नोकरी मिळेपर्यंत वाट पाहावी लागते. तेवढ्या कालावधीत दुसरा कोणताही कोर्स करून एखादी नोकरी हमखास मिळू शकते. त्यामुळे डीएडचा कोर्स करण्याचा विषय मी सोडून दिला आहे, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली.
------
डीएड केलेले अनेक विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत. ठाणे जिल्ह्यात डीएडचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांचे दरवर्षी प्रमाण कमी होत चालले आहे हे नक्की, अशी माहिती डीएड कॉलेजच्या एका प्राध्यापकांनी दिली.