मी कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही - पंकज आशिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:13 AM2020-10-02T00:13:30+5:302020-10-02T00:13:50+5:30
दुजाभावाचा नगरसेवकांनी केला आरोप : भिवंडी पालिकेची झाली महासभा, सदस्यांनी केली टीका
भिवंडी : पालिकेची २५ सप्टेंबरची तहकूब महासभा बुधवारी झाली. यात आयुक्त डॉ. पंकज आशिया हे नगरसेवकांच्या कामाबाबत दुजाभाव करतात, असा आरोप करण्यात आला. आमदार रईस शेख यांच्या कामांना प्राधान्य देतात, अशी टीकाही सदस्यांनी केली. याला उत्तर देताना आयुक्तांनी मी कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही, असे स्पष्ट केले. माझ्याकडे सध्या २४ विकासकामांच्या फायली आदेशासाठी आल्या आहेत. त्याबाबत आपण अभ्यास करून योग्य त्या विकासकामांना लवकरच मंजुरी देणार असल्याचे सांगितले.
जिलानी इमारत दुर्घटनेनंतर आमदार शेख यांनी केलेल्या टिष्ट्वटनंतर आयुक्तांनी कोणतीही शहानिशा न करता दोन पालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, प्रतिनियुक्तीवर आलेल्या सहायक आयुक्त नूतन खाडे यांना निलंबित न करता आयुक्त अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नगरसेवक निलेश चौधरी यांनी केला. तर, सभागृहनेते विलास पाटील म्हणाले की, आम्हाला शहराचा विकास हवा आहे. त्यासाठी आमदारांनी सरकारकडून निधी न आणता शहरात नगरसेवकांविरोधात ओरड करत आहेत, ते चुकीचे आहे. प्रशासनाने महापौरांचा सन्मान राखलाच पाहिजे. तसे न केल्यास आम्ही कार्यालयास टाळे ठोकण्यास मागे हटणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला. नगरसेवक संतोष शेट्टी यांनी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तसेच जखमींना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली.
उपमहापौर इम्रान खान यांनी इमारत दुर्घटनेस सय्यद जिलानी जबाबदार नसल्याचे सांगितले. उलट, ते उद्ध्वस्त कुटुंबीयांना आधार देण्याचे काम करीत असताना त्यांच्यावर महापालिका गुन्हे दाखल करते, हे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी इतर सदस्यांनीही टीका केली.