मी शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले, आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी तुमची - मुख्यमंत्री
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 27, 2023 07:22 PM2023-11-27T19:22:17+5:302023-11-27T19:22:32+5:30
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोमवारी झाले.
ठाणे : मी शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकिय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोमवारी झाले.
०४ जून २०२३ रोजी केलेल्या पाहणीनंतर वसतिगृहाचे रूप पूर्ण बदलून उत्तम दर्जाच्या सोयींनी युक्त असे वसतिगृह देण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री महोदय यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांना दिले होते. त्यानुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण करून, सुमारे ११ कोटी रुपये खर्च करून ९० दिवसात वसतिगृहाचे पूर्ण नवीन रूप साकारण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी वसतिगृहाचे कॅन्टीन, व्यायामशाळा आणि खोल्यांची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले. रुग्णालयातील वातावरण, स्वच्छता, इमारत यांच्यामुळे रुग्ण अर्धा बरा होतो. उरलेला अर्धा भार हा डॉक्टरांवर असतो. तुम्ही या यंत्रणेचा कणा आहात, तुम्ही उत्तम काम करून अत्युच्च उपचार करावा, असेही शिंदे म्हणाले. या सोहळ्यास, आ. प्रताप सरनाईक, माजी आ. रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते. वसतिगृहाचे उद्घाटन करण्यापूर्वी शिंदे यांनी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेचे लोकार्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष येथे भेट देवून या योजनेतील मातृत्व भेट मातांच्या हाती सुपूर्द केली. त्या मातांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी, आयुक्त अभिजीत बांगर यांनी दोन्ही प्रकल्पांबाबत सादरीकरण केले. तसेच, विद्यार्थी प्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले.