विनोदी भूमिका मी गांभीर्याने करतो : भारत गणेशपुरे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:47 PM2018-12-09T13:47:28+5:302018-12-09T13:50:30+5:30
ठाण्यात रविवारी महिला महोत्सव आयोजित केला होता. यावेळी विविध कार्यक्रम पार पडले.
ठाणे : जिथे काम करता तिथे कलाकाराने सावध असावे. मी माझ्या भूमिका प्रामाणीकपणे करत असतो, विनोदी भूमिका मी गांभीर्याने करतो प्रेक्षक त्याकडे विनोदी अंगाने बघतात म्हणून ते हसतात अशा भावना चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे यांनी महिला महोत्सवात व्यक्त केल्या.
प्रारंभ कला अॅकॅडमी, ठाणेतर्फे रविवारी गडकरी रंगायतन येथे महिला महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी भारत गणेशपुरे यांची मुलाखत प्रारंभ कला अॅकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी घेतली. गणेशपुरे यांनी विविध किस्से सांगून प्रेक्षकांमध्ये हशा पिकवला. मी विनोदी असे काम केले नाही, जे काही काम ते प्रामाणिकपणाने करतो. माझ्या भूमिकेकडे तुम्ही विनोदी पणाने पाहता म्हणून माझी भूमिका विनोदी वाटते. अंगविक्षेप करणे मला मान्य नाही असे सांगत त्यांनी फु बाई फुच्या आठवणींना उजाळा दिला. अडाणीपणात जेवढी मजा आहे तेवढी कुठेही नाही. समजायला लागले की आयुष्यातील मजा जाते आणि कठिण होऊन बसते. मला नियमीत भूमिकांपेक्षा विनोदी आणि व्हीलन या दोन भूमिका जास्त आवडतात, व्हीलन हा स्वत:मध्येच जगत असतो त्यामुळे व्हीलनची भूमिका मला जास्त भावते, नियमीत भूमिका मला जास्त आवडत नाही असेही गणेशपुरे यांनी सांगितले. सध्या मी नाटकाकडे वळणार नाही. वर्षभरानंतर नाटकाकडे वळणार आहे. बऱ्याच स्क्रीप्ट माझ्याकडे आल्या आहेत असे सांगत त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रवास उलगडला. मला आजमध्ये जगण्यात आवडते. आज माझ्याकडे प्रसिद्धी आहे उद्या नसेल, आज प्रेक्षक माझ्याकडे पाहतील, उद्या नाही, त्यामुळे मी आज जगण्यात समाधान मानतो असेही ते म्हणाले. दरम्यान, सोलापूरच्या अपर्णा रामतीर्थकर यांनी ‘नाती कशी जपावी’ यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. नातातल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. सखे भाऊ एकमेकांपासून दुरावत चालले आहेत अशी खंत व्यक्त करीत संवेदना का बोथट होत चालल्या आहेत याचे स्पष्टीकरण दिले.