मला डॉक्टर, इंजिनीअर नवरा पाहिजे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:40 AM2021-03-21T04:40:19+5:302021-03-21T04:40:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्या काही वर्षांत लग्न जमणे हा जणू एक सोहळा आणि तो जमवणे म्हणजे एक ...

I want a doctor, an engineer husband ... | मला डॉक्टर, इंजिनीअर नवरा पाहिजे...

मला डॉक्टर, इंजिनीअर नवरा पाहिजे...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे :

गेल्या काही वर्षांत लग्न जमणे हा जणू एक सोहळा आणि तो जमवणे म्हणजे एक व्यवसाय झाला आहे. लग्न जमवताना आधी विचारल्या जातात त्या अपेक्षा; पण आता या अपेक्षांना अटीचे स्वरूप आले आहे. पूर्वीच्या काळी घरातील वडीलधारी मंडळी ठरवतील तिथे मुलं-मुली लग्न करायची. कालांतराने मुलांच्या अटी विचारात घेऊ जाऊ लागल्या आणि आता तर मुलांपेक्षा मुलींच्याच अटी जास्त पाहायला मिळतात. ठाणे जिल्ह्यातील कित्येक मुलींच्या लग्नासाठीच्या अपेक्षा अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. या मुलींना शेतकरी किंवा एखादी छोटी नोकरी करणारा नवरा नको तर त्यांना हवाय उच्चशिक्षित डॉक्टर, इंजिनीअर किंवा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीतला उच्चपदस्थ अधिकारी आणि चाळीत, झोपडपट्टीत राहणारा नाही, तर एखाद्या हायफाय सोसायटीत राहणारा.

लग्न करायचं म्हटलं की, बदलत्या काळानुसार बहुतांश कुटुंबात वधू-वर दोघांच्याही अपेक्षा जाणून घेतल्या जातात. पण, या अपेक्षा दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. ग्लोबल होणाऱ्या ठाणे जिल्ह्याचा बराच भाग अद्यापही ग्रामीण बाजाचा आहे. येथील अनेक तरुण शिक्षणाअभावी पारंपरिक शेतीचा व्यवसाय करतात. बळीराजा लाखोंचा पोशिंदा आहे, मात्र लग्नाच्या मांडवात याची किंमत काडीमोल आहे. ठाणे जिल्ह्यात अनेक वधू-वर सूचक मंडळे आहेत. त्यात हजारो तरुण-तरुणींची नोंदणी आहे. मात्र, यातील बहुतांशी तरुणींच्या अपेक्षा पाहता त्यांना वर निवडताना तो उच्चशिक्षित, उच्चपदस्थ नोकरीचा आणि उच्चभ्रू वस्तीत राहणारा हवा आहे.

सर्वाधिक मागणी...

लग्न करताना हल्लीच्या मुलींच्या अपेक्षा मोठ्या आहेत. डॉक्टर, इंजिनीअर, मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला असलेला, बँकेत उच्चपदस्थ अधिकारी असलेला मुलगा त्यांना वर म्हणून हवा आहे.

शेतकरी मुलगा नवरा म्हणून स्वीकारणाऱ्या मुली खूपच कमी आहेत. किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्याच मुली शेतकरी मुलाची निवड करतात.

----------------------

अटी मान्य असतील तरच बोला

मुलींच्या इतरही अनेक अटी दिसतात. मुलींना मुंबई, ठाणे, पुण्यात राहणारा नवरा हवाय.

तसेच एकत्र कुटुंबात न राहता लग्नानंतर स्वतंत्र राहण्याची त्यांची मागणी असते.

एकत्र कुटुंब असले तरी ते छोटे असावे, स्वतंत्र बेडरूम असावा.

शेती असली तरी शेतात काम करावे लागणार नसेल तर विचार करू, असे वधूपक्षाच्या कुटुंबीयांचे म्हणणे असते.

---------------

कोट

एखादा मुलगा शेतकरी असेल तर त्याबाबत मुली फारशा चौकशीही करीत नाहीत. त्यातही जर एखाद्याची घरची भरपूर जमीन, शेती असेल आणि तिथे शेतात काम करावे लागणार नसेल तरच त्या स्थळाचा विचार करतात. अन्यथा त्यांना चांगला नोकरदार मुलगाच नवरा म्हणून हवाय, अशी माहिती एका वधू-वर सूचक मंडळाच्या प्रमुखांनी दिली.

-------------

आमची मुलगी चांगली शिक्षित असली तर तिच्या भविष्याचा विचार आम्ही करणारच ना? एवढं शिकून तिला शेतात काम करावे लागले तर काय उपयोग? तिचा संसार तिच्या मनासारखा व्हावा हीच आमची इच्छा असते.

- दिनेश धारीवाल, वधूपिता

-------------

शेतकरी हा माणूस नाही का? एखाद्या उच्चशिक्षितापेक्षाही शेतकरी अधिक मेहनत करतो. आता निसर्ग साथ देत नाही आणि मालाला योग्य भाव मिळत नाही, म्हणून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारत नाही. पण, शेतकऱ्याला लग्नाच्या मांडवात नाकारणे चुकीचे आहे.

- बळीराम पानरे, वरपिता

Web Title: I want a doctor, an engineer husband ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.