रुद्रांक्ष ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावेल त्याचवेळी मला मिळेल गुरुदक्षिणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 06:31 AM2023-09-26T06:31:19+5:302023-09-26T06:31:46+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशानंतर प्रशिक्षक अजित पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे/पालघर: चीनमधील फुयांग (हांगजोऊ) येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या संघात १० मीटर एअर रायफल्स प्रकारात चमकदार कामगिरी करून देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटील याच्या सुवर्ण कामगिरीने प्रशिक्षक अजित पाटील यांना अत्यानंद झाला आहे. एखाद्या खेळासाठी खेळाडूमध्ये समर्पणाची भावना असावी लागते ती रुद्रांक्षमध्ये आहे. भविष्यात ऑलिम्पिकमध्ये तो एखादे पदक जिंकेल त्यावेळी तीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा असेल, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.
रुद्रांक्ष हा पाटील यांच्याकडे ठाण्यात नेमबाजीचा सराव करतो. त्याच्या खेळाबद्दल पाटील म्हणाले की, गेली २० वर्षे मी नेमबाजी शिकवत आहे. रुद्रांक्षने खास त्याला शिकवण्यासाठी कोल्हापूरहून ठाण्यात मला बोलवून घेतले होते. २०१८-१९ पासून त्याला मी प्रशिक्षण देत आहे. तो नेमबाजीसाठी गेली पाच वर्षे खूप मेहनत घेत आहे. तो दररोज सात ते आठ तास सराव करतो, त्यानंतर शारीरिक आणि मानसिक व्यायाम करतो. त्याने यात खंड पडू दिला नाही. तो फक्त नेमबाजीसाठी जगतोय असे वाटते. त्याने या खेळासाठी समर्पण दिले. त्याचा परिणाम म्हणजे आजचे यश आहे. त्याची मेहनत, कष्ट याच्या जोरावर त्याने हे यश मिळवले. ठाण्यामध्ये एका शाळेतील शूटिंग रेंजवर तो सराव करतो. एखाद्या खेळाडूला या यशापर्यंत पोहोचायचे असेल तर रुद्रांक्ष पाटील हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आमचे मुख्य ध्येय हे ऑलिम्पिक आहे, अजून काम करायचे आहे. एखादी गोष्ट मिळवायची तर त्याबद्दल शोध घेणे हा त्याच्यामधील आणखी एक चांगला गुण आहे. सुरुवातीला तांत्रिकदृष्ट्या आम्ही कुठे कमी नव्हतो, मात्र अत्याधुनिक साहित्याची कमी होती. त्या साहित्याचा अभ्यास करून, ते उपलब्ध करून घेतले आणि मग त्यावर सराव केला. शूटरकडून जे प्रशिक्षकाला हवे असते ते त्याने दिले, त्याच्या पालकांकडून पाठिंबा मिळाला.
पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या हेमांगिनी पाटील या दाम्पत्याचा रुद्रांक्ष हा मोठा मुलगा आहे. रुद्रांक्षच्या कामगिरीचा आज या दोघांनाही अभिमान वाटत आहे.
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ भारतीयांसाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आली. मागील दोन दिवसांपासून घरात देवाची प्रार्थना, मनाची चलबिचल अशा प्रचंड तणावामध्ये आम्ही वावरत होतो. रुद्राक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीला परमेश्वराचे आशीर्वाद लाभले आणि सकाळी त्याने देशाला दिलेल्या गोड बातमीने आमचा ऊर भरून आला.
-बाळासाहेब पाटील,
रुद्राक्षचे वडील