बाळासाहेबांचे ते शब्द मी कधीही विसरू शकणार नाही : आदेश बांदेकर
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 21, 2023 03:47 PM2023-12-21T15:47:59+5:302023-12-21T15:48:39+5:30
आदेश बांदेकर यांनी गुंफले स.वि कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प.
ठाणे : बाळासाहेबांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत मला मातोश्रीवर बोलाविले होते, आणि भगव्याचे वेड सुरुवातीपासूनच असल्याने मी माझे आदर्श बाळासाहेबांना भेटून शिवसेनेत प्रवेश केला. “राजकारणात अपयश आले तरीही, आमच्या हृदयात तुम्हाला कायमचे स्थान आहे”, हे बाळासाहेबांचे शब्द मी कधीही विसरू शकणार नाही, असे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
गुरुवर्य स.वि कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचे या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अभिनेते बांदेकर यांनी गुंफले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीशचंद्र प्रधान, सहसचिव मानसी प्रधान, खजिनदार सतीश शेठ, आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश भगुरे यांच्या हस्ते स्वामी समर्थांची मूर्ती, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कवयित्री डॉ. प्रज्ञा पवार आणि निवेदिका वृंदा दाभोलकर यांनी मुलाखत घेतली.
स्वतःच्या जीवन प्रवासाबद्दल बांदेकर म्हणाले की,’लहानपणापासून मिळेल ते काम ,जमेल ते काम आनंदाने करायचे आणि ते काम देव मानून करायचे’ महाविद्यालयीन युवावर्गाला संबोधित करताना ते म्हणाले, “कठीण परिस्थितीत केलेली सकारात्मक वागणूक उज्ज्वल भविष्य घडवते, याची अनुभूती मला मिळाली” सुरुवातीला मिळेल ती छोटी कामे करतानाच महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम तसेच पुरुषोत्तम बेर्डे यांच्या टुरटुर, मुंबई – मुंबई या नाटकांमधून अभिनय केला. नाटक, कला, क्रिडा, विविध मालिका ते राजकारण आणि राजकारणातून साधलेले समाजकारण, यांवर ते बोलले. “माझे बालपण अलिबागेत गेले, नंतर अभ्युदयनगर येथे मी वाढलो, त्यामुळे आजही मी लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत न चुकता सहभागी होतो असे ते म्हणाले.
'होम मिनिस्टर' बद्दल बोलताना ते म्हणाले, “सुरुवातीला केवळ १३ भागांसाठी प्रसारित केला जाणारा ह्या कार्यक्रमाने आज यशस्वीपणे २० वर्षे पूर्ण केली, आणि जगातील हा एकमेव कार्यक्रम आहे की रोज ज्याचे नवनवीन भाग प्रसारित होतात. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश भगूरे यांनी प्रास्ताविक केले. या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचे सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.महेश कुलसंगे यांनी केले. तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा शंकर झंजे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. प्रा.दिलीप वसावे, परिमल पाखरे यांनी अहवाललेखन केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.