मी कोणतीही पगडी घालणार नाही- प्रेमानंद गज्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:54 AM2019-01-28T00:54:11+5:302019-01-28T00:54:30+5:30
ठाण्यात रंगला नाट्यसंमेलनाध्यक्षांचा सत्कार सोहळा
ठाणे : नाट्य किंवा साहित्य संमेलनात पेशवाई पगडी घातली जाते; मात्र मी कोणतीही पगडी घालणार नाही. माझी पगडी ही माझी असेल, ती ज्ञानाची असेल. विचारांची पगडीच मी संमेलनात घालणार आहे. जे कोणी पगडी घालू इच्छितात त्यांच्यामागे त्यांची तत्त्वप्रणाली असते. प्रत्येक तत्त्वप्रणाली ही परिपूर्ण नसते, म्हणून मला कोणाचीही पगडी नको, असे स्पष्ट मत प्रसिद्ध नाटककार आणि ९९ व्या मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद ठाणे शाखा यांच्यावतीने गज्वी यांच्या सत्काराचा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजिला होता. प्रसिद्ध समीक्षक डॉ.अनंत देशमुख यांच्या हस्ते गज्वी यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर झालेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. साहित्य आणि नाटक हे दोन्ही वेगवेगळे आहेत, असे मला वाटत नाही. नाटक वाङ्मयचाच भाग आहे. नाटक लिहून दिग्दर्शकाकडे जाते, मग नाटकाचे रूपांतर संहितेत होते. नाटकाला साहित्याचा दर्जा मिळालाच पाहिजे. खरं तर आपल्याकडे होणारी वेगवेगळी नाट्य आणि साहित्य ही संमेलने एकाचवेळी घ्यायला हरकत नाही, असे गज्वी म्हणाले. तर वर्षभर मी उपक्रम राबवावे म्हणून माझी निवड केलेली नाही. संमेलनाध्यक्ष नाही तर उपक्रम राबविण्यासाठी साहित्य महामंडळ आणि नाट्य परिषद असून परिषदेने विविध उपक्रमाांसाठी आर्थिक तरतूद करावी, असे मत व्यक्त केले. मकरंद जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.
‘मातोश्री’चे आज चित्र बदलले
त्याकाळी आम्ही मित्रांनी केलेल्या हुंडाविरोधी चळवळीच्या बातम्या वाचून बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मातोश्रीवर बोलावून एकत्र काम करण्याचे सुचविले होते. कालांतराने शिवसेनेने हिंदुत्वावर जास्त जोर दिला आणि मग सत्तेसाठी भांडणे सुरू झाली. मी तिथे गेलो असतो तर मला हे सगळे लिहिता आले नसते. परंतु माझे तिथे न गेल्याने काही बिघडलेले नाही आणि आज मातोश्रीचे चित्र बदलले आहे अशी खंत गज्वी यांनी यावेळी बालून दाखवली.