खासगी संस्थेने जागेवर दावा केल्याने आयबी शाळेचा उपक्रम अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:43 AM2021-09-25T04:43:40+5:302021-09-25T04:43:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : दर्जेदार शिक्षणाच्या सुविधेसाठी उथळसर येथे महापालिका आणि जितो ट्रस्टच्या संयुक्त माध्यमातून आयबी तसेच आयसीएसई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दर्जेदार शिक्षणाच्या सुविधेसाठी उथळसर येथे महापालिका आणि जितो ट्रस्टच्या संयुक्त माध्यमातून आयबी तसेच आयसीएसई शाळा उभारण्यात येणार आहे. परंतु सालेभाई हबिबउल्लाह विश्वस्थ संस्थेने या जागेवर दावा केल्याने पालिकेचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यासंबंधीच्या प्रस्तावास ठामपाच्या स्थायी समितीनेही बुधवारी मान्यता दिली.
उथळसर येथे महापालिका आणि जितो ट्रस्टच्या संयुक्त माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या आयबी तसेच आयसीएसई शाळेच्या प्रकल्पासाठी महापालिकेने जितो ट्रस्टसोबत करार केला आहे. या प्रकल्पाचे दोन वर्षांपूर्वी भूमिपूजनही झाले. मुळात जागा ताब्यात नसतानाही महापालिकेने ट्रस्टसोबत करार केल्याची बाब अलीकडेच सर्वसाधारण सभेत समोर आली होती. या जागेचे मूळ मालक असलेल्या सालेभाई हबिबउल्लाह ट्रस्टने ही जागा एका व्यक्तीला विकली असून त्यांनी शाळा प्रकल्प राबविण्यास मज्जाव केला होता. यामुळे शाळा पुनर्विकासाचा प्रकल्प वादात सापडल्यामुळे पालिकेने विशेष दिवाणी दावा दाखल केला. त्याच्या मंजुरीचा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता.
इमारत धोकादायक झाल्यामुळे केली रिकामी
महापालिकेची शाळा या जागेवर अस्तित्वात होती. २०११ पर्यंत या शाळेमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होते. ही इमारत धोकादायक झाल्यामुळे ती रिकामी करण्यात आली. या जागेचा ताबा महापालिकेकडे आहे. परंतु या जागेचा संपूर्ण व्यवहार शेवटास नेणे आणि ही जागा नावावर करण्यासाठी पालिकेने न्यायालयात विशेष दिवाणी दावा दाखल केला आहे, असे पालिका प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.
----------