ब्रिटिशकालीन पुलांवरील वाहतूक होणार बंद?, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर बांधकाम विभागाचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:38 AM2017-10-02T00:38:52+5:302017-10-02T00:38:57+5:30
इंग्रज राजवटीतील सुमारे सात पूल आजही जिल्ह्यात तग धरून उभे आहेत. एक शतकापेक्षा अधिक काळापासून असलेल्या या पुलांवर आजही रहदारी आहे.
सुरेश लोखंडे
ठाणे : इंग्रज राजवटीतील सुमारे सात पूल आजही जिल्ह्यात तग धरून उभे आहेत. एक शतकापेक्षा अधिक काळापासून असलेल्या या पुलांवर आजही रहदारी आहे. मात्र, तीन पूल अवजड वाहनांसह हलक्या वाहनांसाठीदेखील बंद केले आहेत. तरीही लोकांची त्यावरून येजा सुरूच आहे. यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून ही रहदारीदेखील बंद करावी की काय, हा विचारविनिमय बांधकाम विभागात जोरदारपणे सुरू आहे.
एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेमुळे ब्रिटिशकालीन पुलांकडे बांधकाम खात्याने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात आजमितीस सात पूल आहेत. यामध्ये भिवंडी तालुक्यात दोन, शहापूर तालुक्यातील कसारा गावात दोन, कल्याणमधील दोन आणि वाडा-मनोर-पालघर रस्त्यावरील सूर्या नदीवरील पूल ब्रिटिशकालीन असल्याची नोंद बांधकाम विभागाकडे आहे. यातील तीन पुलांवरून आजही वाहतूक सुरळीत सुरू आहे. यामध्ये भिवंडीतील कामवारी नदीवरील पुलासह सूर्या नदीवरील पूल आणि उल्हास नदीवरील रायता पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक सुरू आहे.
खबरदारीची उपाययोजना म्हणून वाहतुकीसाठी सुरू असलेल्या या पुलांकडे बांधकाम विभागाने आता लक्ष केंद्रित केले असून जिल्हा प्रशासनातही त्यावर जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. भिवंडीला लागून असलेला सैतानी पूल हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद केला आहे. राष्टÑीय महामार्ग ६२१ वर तो आहे. कर्जत, कल्याण व भिवंडीजवळून हा महामार्ग जव्हारच्या दिशेने पुढे जातो. भिवंडीलाच लागून असलेला कामवारी नदीवरील पूल ब्रिटिशकालीन आहे. १९२९ मध्ये बांधलेला हा पूल वाहतुकीस योग्य आहे, पण लवकरच त्यावरील वाहतूक बंद करावी लागणार आहे. त्याला लागूनच नवीन पूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याचे कार्यकारी अभियंता जिभाऊ गांगुर्डे यांनी लोकमतला सांगितले.
कल्याण खाडीवरील दुर्गाडी किल्ल्यास लागूून असलेला पत्रीपूल काही वर्षांपासून सर्वच प्रकारच्या वाहतुकीस बंद केला आहे. बाजूलाच नवा पूल तयार केला असून त्यावरून वाहतूक सुरू आहे. तर, उल्हास नदीवर रायते गावाजवळील पूल १९४७ मध्ये बांधलेला आहे. कल्याण-नगर राष्टÑीय महामार्गावरील हा पूल सुस्थितीत असून वाहतूक सुरू आहे. सूर्या नदीवर वाडा-पालघर-मनोर महामार्गावरील पूल १९४१ मध्ये बांधलेला आहे. त्यावरील अवजड वाहतूक बंद करून नवीन पुलावरून ती सुरू आहे.
शहापूर तालुक्यातील कसारा गावात दोन काँक्रिटचे ब्रिटिशकालीन पूल आहेत. कमानीचे बांधकाम असलेल्या या दोन पुलांपैकी एका पुलाची मुदत सुमारे १० वर्षांपूर्वीच संपलेली आहे. त्यावरील अवजड वाहतूक काही वर्षांआधीच बंद केली होती. आता हलक्या वाहनांसाठीदेखील हा पूल एक वर्षापासून बंद केला आहे. दुसरा पूल सुस्थितीत असल्यामुळे त्यावरून सुरळीत वाहतूक सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी सांगितले. त्या सर्वच पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या मानसिकतेत बांधकाम विभाग असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन विचारविनिमय करत आहे.