प्र्रत्येकाने लिखाण केल्यास वैचारिक क्रांती होईल : डॉ. विजय बेडेकर यांचे ठाण्यात प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 04:54 PM2018-08-12T16:54:06+5:302018-08-12T16:56:01+5:30
डॉ. बेडेकर विद्या मंदीर माध्यमिक विभागाच्या शिक्षीका साधना जोशी लिखित ‘जयोस्तुते’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला
ठाणे : कोमल प्रकाशनच्यावतीने डॉ. बेडेकर विद्या मंदीर माध्यमिक विभागाच्या शिक्षीका साधना जोशी लिखित ‘जयोस्तुते’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विद्यालंकार सभागृहात संपन्न झाला. यावेळी समाज प्रबोधनासाठी सावरकर विचार अशा पुस्तकांच्या माध्यमातून पसरले जाणे गरजेचे आहे असे मत डॉ. विजय बेडेकर यांनी व्यक्त केले.
डॉ. बेडेकर म्हणाले की, जास्तीत जास्त वाचन करुन मन व बुद्धी उत्तम संस्कारीत व्हायला हवी असे मत देखील त्यांनी मांडले. समाज प्रबोधनासाठी सावरकर विचार अशा पुस्तकांच्या माध्यमातून पसरले जाणे गरजेचे आहे. मराठी भाषा टिकवण्याचे आवाहन करीत ते म्हणाले की, सावरकर कालातीत आहे त्यांनी आपल्याला खुप दिले आहे आता आपण त्यांना परत देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सावरकर साहित्य वाचा, भाषेवर प्रेम करा, उत्तम नागरिक बना असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ व सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकरराव गोखले, विद्या प्रसारक मंडळाचे सभासद उत्तम जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पांचाळ यांनी तर आभार संध्या झंझाड यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उदय सप्रे यांनी केले. सावरकरांच्या निवडक कवितांचे विवेचन या पुस्तकात केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गोखले यांनी संस्थेच्यावतीने सावरकरांची प्रतिमा डॉ. बेडेकर यांना भेट दिली. सुमेधा बेडेकर यांनी सादर केलेल्या ‘ने मजसी ने’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.