स्वावलंबनाचा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 02:20 AM2018-08-12T02:20:34+5:302018-08-12T02:20:51+5:30

भार्इंदर पश्चिमेतील श्री सालासर राधावल्लभ गृहसंकुल गृहनिर्माण संस्थेने वीज, पाणी याबाबत स्वावलंबनाचा नवा आदर्श घालून दिला आहे. सुरक्षेचे अत्याधुनिक उपाय आणि कचरा वर्गीकरणाचे उचललेले पाऊल यामुळे सर्वच आघाड्यांवर सोसायटीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

 The ideal of self reliance | स्वावलंबनाचा आदर्श

स्वावलंबनाचा आदर्श

Next

- धीरज परब

वीजबचतच नव्हे तर वीजनिर्मिती करून दरमहिन्याला गृहनिर्माण संस्थेची हजारो रुपयांची बचत करणारी, कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण करून स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळवणारी आणि पावसाच्या पाण्याचे संकलन करून टंचाईमुक्त झालेली भार्इंदरची ‘श्री सालासर राधावल्लभ गृहसंकुल गृहनिर्माण संस्था’ शहरातील हजारो गृहनिर्माण संस्थांना प्रेरणादायी ठरली आहे.
भार्इंदर पश्चिमेला डी-मार्टजवळ श्री सालासर राधावल्लभ गृहसंकुल आहे. दहा मजली संकुलात तीन विंग असून ११७ सदनिका आहेत. २०१० साली स्थापन झालेल्या गृहनिर्माण संस्थेत मराठी, गुजराती, राजस्थानी, उत्तर भारतीय आदी गुण्यागोविंदाने आणि एकोप्याने राहतात. गृहसंकुलात गणेशोत्सव, नवरात्री, होळी, दिवाळी आदी सणांसह स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन तसेच नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यंदापासून जन्माष्टमीसुद्धा साजरी केली जाणार आहे. सजावटीसाठी रहिवाशांकडील टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यास प्राधान्य दिले जाते.
सध्या संस्थेची सात सदस्यांची कार्यकारिणी असून अध्यक्ष जय मेहता, सचिव प्रशांत गुप्ता, तर कोषाध्यक्ष ओमप्रकाश गुप्ता यांच्यासह दोन महिला सदस्य आहेत. संकुलात राहणारे सचिन पवार, मनीष जाधव, प्रदीप जोशी, प्रकाश साळवी, मिराशे आदी मराठी कुटुंबीय संकुलाच्या कार्यात सक्रिय सहभागी असतात.
मीरा-भार्इंदरमध्ये पाणीटंचाई नेहमीच भेडसावत असते. परंतु, रहिवाशांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात केली आहे. पावसाळी पाणी भूगर्भात जिरवल्याने संकुलाला रोज सुमारे १८ हजार लीटर पाणी मिळते. उन्हाळा वाढत चालला की, भूगर्भातली पाण्याची पातळी कमी होऊन १० हजार लीटर पाणी दररोज मिळते. रहिवाशांनी जलशुद्धीकरण (आरओ) प्लांट बसवला आहे. तरीदेखील या पाण्याचा वापर अंघोळ, धुणीभांडी, स्वच्छतागृह, उद्यान आदींसाठी केला जातो.
महापालिकेच्या ओला व सुका कचरा वर्गीकरणाच्या आवाहनानंतर रहिवाशांनी १०० टक्के कचरा वर्गीकरण सुरू केले आहे. सध्या ओला कचरा पालिका नेत असली, तरी लवकरच गांडूळ खत प्रकल्प उभारण्याची योजना आहे. संकुलाच्या स्वच्छतेसाठी रोज नऊ तासांकरिता हाउस कीपिंग एजन्सीची नेमणूक केली आहे. १०० टक्के कचरा वर्गीकरण व स्वच्छतेमुळे संकुलाला महापालिकेने स्वच्छतेबद्दल फाइव्ह स्टार दिले आहेत. आयसीआयसीआय बँकेनेही स्वच्छतेबद्दल पुरस्कार दिला आहे. प्लास्टिकबंदीनंतर रहिवाशांकडील प्लास्टिक गोळा करून पालिकेकडे जमा करण्यासाठी कार्यकारिणीने पुढाकार घेतला.
इमारत व रहिवाशांची सुरक्षा यामध्ये कोणतीही उणीव राहू नये, याकरिता संकुलात २५ सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. लवकरच इंटरनेट सुविधेद्वारे सीसीटीव्ही फुटेज प्रत्येक रहिवाशांना त्यांच्या मोबाइलवर दिले जाणार आहे. याशिवाय, आठ सुरक्षारक्षक तैनात केलेले आहेत.
विजेच्या बाबतीत संकुल स्वावलंबी आहे. तीन विंगमध्ये सहा लिफ्ट आहेत. संकुलातील सार्वजनिक ठिकाणी वीजबचतीसाठी एलईडी लाइट लावले आहेत. रहिवाशांना लिफ्ट व सार्वजनिक दिवाबत्तीसाठी पूर्वी महिन्याला ५० ते ५५ हजार रुपये इतके वीजबिल यायचे. आता मात्र अवघे १७०० ते तीन हजार रुपये मोजावे लागतात. गेल्यावर्षी २२ लाख खर्च करून सौरऊर्जेची यंत्रणा उभारली आहे. त्यापैकी पाच लाख सरकारी अनुदान मिळणार आहे. इमारतीच्या गच्चीवरील मोकळी जागा तशीच ठेवून जिने, लिफ्ट व पाण्याच्या टाकीवरच्या मोकळ्या जागेत सौरऊर्जेचे ९६ पॅनल उभारले आहेत. परिणामी, संकुलाला लागणाºया विजेपेक्षा अतिरिक्त वीज ही वीजपुरवठा करणाºया कंपनीच्या ग्रीडमध्ये जाते. शिवाय, महिन्याला वीजबिलापोटी तब्बल ५० हजार वाचत असल्याने रहिवाशांना याचा फायदाच होत आहे.

Web Title:  The ideal of self reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.