मदतीसाठी आदर्श शिंदे करणार चॅरिटी शो, अभिनय कट्ट्याला सहाय्य, सरकारकडूनही मिळवून देणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 06:29 AM2017-09-13T06:29:53+5:302017-09-13T06:29:53+5:30
अभिनय कट्ट्याच्या मदतीसाठी आता प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे हेदेखील पुढे सरसावले आहेत. कट्ट्याला मदत मिळवून देण्यासाठी ते एक चॅरिटी शो करणार असून सरकारकडूनही काही साहाय्य मिळते का, यासाठी प्रयत्न करणार आहेत.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : अभिनय कट्ट्याच्या मदतीसाठी आता प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे हेदेखील पुढे सरसावले आहेत. कट्ट्याला मदत मिळवून देण्यासाठी ते एक चॅरिटी शो करणार असून सरकारकडूनही काही साहाय्य मिळते का, यासाठी प्रयत्न करणार आहेत.
अभिनय कट्ट्याची २९ आॅगस्टच्या पुरात पुरती वाताहत झाली असून आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कट्ट्याकडून ठाणेकरांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यांच्या मदतीसाठी काही रसिक आणि कलाकार धावले आहेत. तर, मोजक्या राजकीय नेत्यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. सध्या कट्ट्याकडे संथगतीने मदतीचा ओघ सुरू आहे. या तुटपुंज्या मदतीत कट्टा पुन्हा उभा करणे अशक्यच आहे. तो पुन्हा सुरू कधी होणार, असा प्रश्न कट्ट्याचे कलाकार करत असले तरी आताची परिस्थिती पाहता याचे कोणाकडेच उत्तर नाही. अनेक जण कट्ट्याची परिस्थिती पाहायला येत आहेत. परंतु, तुलनेने मदत मात्र तुटपुंजीच येत आहे. या परिस्थितीतून कट्ट्याला बाहेर काढण्यासाठी आदर्श यांनी आपला हात पुढे केला आहे. अभिनय कट्ट्याची परिस्थिती पाहून अत्यंत वाईट वाटत आहे.
९० टक्के लोक फक्त सांत्वन करत असल्याचे कळते. आर्थिक मदतीसाठी मात्र फार कोणी पुढे येत नाही, अशी खंत व्यक्त करून ही चळवळ खूप मोठी आहे. त्यांचे कार्य मोठे आहे. ती पुन्हा उभी राहिलीच पाहिजे, अशी आशा त्यांनी व्यक्तकेली आहे. लेखक सचिन दरेकर, संगीत दिग्दर्शक अमित राज यांच्या सहभागाने आणि अनेक कलाकारांच्या साहाय्याने ठाण्यातच हा चॅरिटी शो ते करणार आहेत. यात जास्तीतजास्त कलाकारांना सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्या या कार्यक्रमाविषयी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. दोन महिन्यांत हा कार्यक्रम होईल, असे सांगून या कार्यक्रमात जास्तीतजास्त कलाकारांनी सहभागी व्हावे, सर्वांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. कट्ट्याकडे हजारो पुस्तके होती. या पुस्तकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारकडून यासाठी कोणती मदत मिळते का, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांच्या मदतीने कट्ट्याचे झालेले नुकसान भरून काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कट्ट्यासाठी उपयुक्त पुस्तकांची देखील जुळवाजुळव
धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे यांनीही सोमवारी कट्ट्याला भेट दिली आणि सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन पुरात नुकसान झालेले सर्व साहित्य जास्तीतजास्त लोकांच्या मदतीने मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी कट्ट्याचे अध्यक्ष किरण नाकती यांना दिले.
व्यास क्रिएशन्सच्या वतीने ग्रंथालय उभारणीसाठी पुस्तके देण्याची मदत केली जाणार आहे. कट्ट्यासाठी उपयुक्त असलेले पुस्तकांची सध्या जुळवाजुळव सुरू असून येत्या दोन दिवसांत व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड ५०० पुस्तके नाकती यांच्याकडे सुपूर्द करतील, असे त्यांनी सांगितले.