आदर्श शिक्षक केवळ कागदावर नसावा तो विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा : प्रा. प्रविण दवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 04:41 PM2019-09-25T16:41:29+5:302019-09-25T16:45:43+5:30
प्रा. प्रविण दवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यातून आजच्या शिक्षकांना कानमंत्र आणि सल्ला दिला. तसेच, नव्या पिढीचे त्यांनी कौतुक केले.
ठाणे : आदर्श शिक्षक हा केवळ कागदावर नसावा तर तो विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा. आदर्शपण हे रियाजामुळे मिळत असते. परंतू हल्ली तो रियाजच हरवत चालला आहे अशी खंत ज्येष्ठ कवी प्रा. प्रविण दवणे यांनी व्यक्त केली. भारत वाचणार असेल तर तो पालक आणि तळमळीने शिकवणाऱ्या शिक्षकांमुळेच. आजची पिढी उत्तम आहे परंतू ज्यांच्या हातात ती पिढी आहे ते पालक आणि शिक्षक किती संवेदनशील आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने बुधवारी शिक्षक दिनाच्यानिमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी कोचिंग संचालकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शहनाई हॉल येथे संपन्न झाला. यावेळी विद्याश्री क्लासेसचे प्रकाश पाटील यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच, शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, सभासद सन्मान पुरस्कार, उत्कृष्ट सभासद पुरस्कार, पुरग्रस्तांना निधी देणाºया शिक्षकांना पुरग्रस्त मदतनिधी प्रशस्तीपत्रक आणि नविन सभासदांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांचे व्यक्तिमत्त्वही महत्त्वाचे अशते असा कानमंत्र देत प्रा. दवणे म्हणाले, आजची पिढी ही शिक्षकांना तपासून घेत असते. पहिल्या तीन चार ओळींतच विद्यार्थ्याला कळते की त्या शिक्षकाचा किती सखोल अभ्यास आहे. आता नव्या पिढीला चकवणे हे अशक्य आहे कारण आताची पिढई तरबेज आहे. मी माझ्या अध्यापनाच्या ३५ वर्षांत कधीही विद्यार्थ्याला गेट आऊट म्हणालो नाही कारण विद्यार्थी वर्गाबाहेर हकलला की विद्यार्थी बाहेर जातो आणि समस्या आत येते. खरा शिक्षक हा मस्टरवर नाही तर नव्या पिढीच्या डोळ््यावर सही करतो. माझ्या नावावर सव्वाशे पुस्तके आहे त्याचे मुळ मी शिक्षक आहे यात आहे. मी आॅफ तास हा कधीही आॅफ ठेवला नाही तर आॅफ तास मी आॅन ठेवला. मी केवळ शाळेत, ग्रंथालयात शिकलो नाही तर शिक्षण जगवणाºया गुरुवर्यांकडे पाहूनही शिकलो. शैक्षणिक संघटना परिपक्व झाल्या तर समाज पुढे जाईल असा सल्लाही दवणे यांनी दिला. यावेळई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. एस. पठाण उपस्थित होते. ते म्हणाले, जगात आई वडिल आणि शिक्षक हे तीन शब्द आदर्श आहे. शिक्षक हा समाज घडवित असतो. यावेळी पठाण यांनी सर उठाओ तो कोई बात बने हे गाणे सादर केले. सोहळ््या प्रसंगी संघटनेचे सतीश देशमुख, सचिव सचिन सरोदे, खजिनदार सुनिल सोनार व इतर उपस्थित होते.