‘आम्ही पण वाचतो’ उपक्रमात कथासंग्रहांवर विचारमंथन, कोमसाप, ठाणे आणि जवाहर वाचनालयाचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 03:37 PM2018-07-17T15:37:26+5:302018-07-17T15:40:13+5:30
‘आम्ही पण वाचतो’ उपक्रमात कथासंग्रहांवर विचारमंथन करण्यात आले. कोमसाप, ठाणे आणि जवाहर वाचनालयाचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.
ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे आणि जवाहर वाचनालय, कळवा यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनमंच उपक्रमांतर्गत कथासंग्रहांवर ‘आम्ही पण वाचतो’ या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात तेरा वाचकांनी विविध कथासंग्रहांवर आपली मते मांडली. कळवा येथील जवाहर वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिका भारती मेहता प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. जवाहर वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष पाटील हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कोमसापच्या ठाणे शहर शाखेच्या अध्यक्ष मेघना साने यांनी उपस्थितांचे स्वागत करताना, आपल्या प्रास्ताविकात ‘आम्ही पण वाचतो’ या वाचकमंच उपक्रमाची भूमिका विशद केली.
वाचनसंस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी कोमसापतर्फे सातत्याने राबविण्यात येणाऱया साहित्यविषयक उपक्रमांची माहिती देताना मेघना साने यांनी, ‘आजवर रसिकवर्ग जोपासून वाचकांनाही व्यासपीठ मिळावे, नवे वक्ते शोधून त्यांना बोलते करण्यासाठी असे कार्यक्रम विविध वाचनालयांमध्ये सादर करण्यात येतात. त्यातून लेखक, पुस्तक आणि वाचक यांच्यात समन्वय साधला जातो,’ असे सांगितले. ‘दर तीन महिन्यांनी वाचकमंच उपक्रम आयोजित केला जातो,’अशीही माहिती त्यांनी दिली. यावेळी संध्या लगड यांनी जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहातील कथांवर प्रकाशझोत टाकला. नूतन बांदेकर यांनी अनुराधा गोरे यांच्या ‘वारस होऊ अभिमन्यूचे’ या पुस्तकावर विवेचन केले. माधुरी बागडे यांनी दिवाकर कृष्ण यांच्या ‘समाधी आणि इतर सहा गोष्टी’ या कथासंग्रहावर, विवेक गोविलकर यांनी आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ या कथासंग्रहावर, राधा पंडित यांनी ‘आरंभ’ या लघुकथा संग्रहावर विचार मांडले. वृषाली राजे यांनी व्यंकटेश माडगुळकर यांच्या ‘सर्वा’ या कथासंग्रहातील कथा सांगितली. डॉ. सुधाकर फडके यांनी सदानंद रेगे यांच्या कथांचा आढावा घेतला. विजयराज बोधनकर यांनी सोमसुंदर यांनी संपादित केलेल्या तमीळ कथासंग्रहाचा श्रीपाद जोशी यांनी केलेल्या अनुवादातील न. पिच्चमूर्ती यांच्या‘आराधना’ या कथेवर भाष्य केले. मनोहर पाटील यांनी डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांच्या ‘बाभळीचे काटे’ या पुस्तकावर तर सुनील शिरसाट यांनी विजय देवधर यांच्या ‘कावा’ या पुस्तकावर आणि संगीता कुलकर्णी यांनी विवेक गोविलकर यांच्या‘पाऊले वाजती’ या पुस्तकावर संक्षिप्त असे विवेचन केले. नचिकेत दीक्षित यांनी ओ हेन्री यांची ‘हार’ ही कथा आणि स्नेहा शेडगे यांनी द. ता. भोसलेची ‘मनस्विनी’ पुस्तकातील ‘अन्नदान’ ही कथा सादर केली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या भारती मेहता यांनी सर्व वक्त्यांच्या कथा सादरीकरणावर भाष्य करताना, ‘कथा हा साहित्यप्रकार अतिशय ओघवता आणि परिणामकारक आहे. कथाबीज हे सशक्त असेल तर ती कथा वाचताना वाचकाला अंतर्मुख करते आणि तो त्या कथासूत्रात अधिकाधिक गुंतून जातो. मराठी कथांच्या विषयात असणारे वैविध्य वाचकाला आनंद देत असते. अशा कथांवर विचारमंथन होणे ही काळाची गरज आहे,’ असे मत विविध दाखले देत व्यक्त केले. मराठीसह इंग्रजी साहित्यातील कथांचा आढावा त्यांनी घेतला. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची एक कथा सांगून, ‘पंचविस वर्षांपूर्वी वाचलेली ती कथा अजूनही आपल्या मनात घर करून बसली आहे,’ असे त्यांनी सांगितले. प्रतिक्षा बोरडे यांनी ओघवत्या शैलीत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संगीता कुलकर्णी या कार्यक्रमाच्या समन्वयक होत्या. या कार्यक्रमासाठी लेखक,वाचक, साहित्यप्रेमी, पत्रकार आणि कोमसापचे तसेच जवाहर वाचनालयाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.