कॅमेऱ्यासमोर उमेदवारांची ओळख परेड
By admin | Published: February 14, 2017 02:52 AM2017-02-14T02:52:25+5:302017-02-14T02:52:25+5:30
निवडणुक आयोगाच्या माध्यमातून प्रथमच उमेदवारांच्या ओळख परेडचा कार्यक्रम रविवारी ठाण्यात झाला. ऐन सुट्टीच्या दिवशी
ठाणे : निवडणुक आयोगाच्या माध्यमातून प्रथमच उमेदवारांच्या ओळख परेडचा कार्यक्रम रविवारी ठाण्यात झाला. ऐन सुट्टीच्या दिवशी प्रत्येक मतदार घरी उपस्थित असतांनाही उमेदवार मात्र कॅमेऱ्यासमोर आपली ओळख देत होता. दीड मनिटांच्या या ओळख परेडमध्ये आपले नाव, प्रभाग क्रमांक, कोणत्या मुद्यांवर निवडणुक लढवतो अशी माहिती कॅमेऱ्यासमोर त्यांनी दिली. एका स्वयंसेवी संस्था आपल्या वेबसाईटवर ही माहिती प्रसिध्द करणार आहे. मतदारांनी आपल्या उमेदवाराचा हा व्हिडीओ पाहावा आणि आपल्याला हवा असलेला योग्य उमेदवार निवडावा, हा यामागचा उद्देश आहे.
त्यातही रविवारची संधी साधत अनेक उमेदवारांनी रिक्षा फिरवत, मेसेज करत, जमेल तितक्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत प्रचारातील सुट्टीचा दिवस कारणी लावला.
रविवारच्या प्रचारासाठी उमेदवारांची सकाळपासूनच गडबड सुरु होती. परंतु मध्येच त्यांना अशा प्रकारच्या ओळख परेडसाठी जावे लागल्याने काही जणांचा हिरमोड झाला. आचारसंहितेचा भंग नको किंवा नियम मोडल्यांचे सावट नको म्हणून प्रत्येकजण तेथे हजर राहत होता. आॅपरेशन ब्लॅक डॉट (ओबीडी) या स्वयंसेवी संस्थेने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राज्यभरात व्यापक प्रयत्न सुरू केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगानेसुद्धा या प्रयत्नांना हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार
ओबीडी प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांचे एक ते दीड मिनिटांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ते आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध करणार आहे. त्यासाठी या संस्थेचे स्वयंसेवक रविवारी ठाण्यातील १२ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडकले होते. शनिवारीच सर्व उमेदवारांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे फर्मान पालिकेने सोडले होते. रविवारचा प्रचाराचा दिवस मोडून तिथे जावे लागणार असल्याने अनेक उमेदवार वैतागले होते.
प्रत्येक उमेदवाराला एक ते दीड मिनिटांत कॅमेऱ्यासमोर आपले मनोगत व्यक्त करण्याच्या सूचना या स्वयंसेवकांकडून दिल्या जात होत्या. त्यानुसार नाव, पक्ष, प्रभागाची माहिती देण्यासोबतच ही निवडणूक आपण का लढवत आहोत आणि जिंकल्यानंतर प्रभागातील काय कामे करणार आहोत, याची माहिती प्रत्येकजण देत होता. (प्रतिनिधी)