प्रत्येक गुन्ह्यात आरोपींची ओळख परेड आवश्यक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 05:14 AM2018-03-03T05:14:22+5:302018-03-03T05:14:22+5:30

चोरी, दरोड्यासारखे गुन्हे करताना आरोपी स्वत:ची ओळख लपवितात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आरोपींची ओळख परेड अत्यावश्यक आहे का, असा सवाल करत, ठाणे न्यायालयाने तीन सोनसाखळी चोरांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

The identity parade of the accused is not required for each offense | प्रत्येक गुन्ह्यात आरोपींची ओळख परेड आवश्यक नाही

प्रत्येक गुन्ह्यात आरोपींची ओळख परेड आवश्यक नाही

googlenewsNext

राजू ओढे 
ठाणे : चोरी, दरोड्यासारखे गुन्हे करताना आरोपी स्वत:ची ओळख लपवितात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आरोपींची ओळख परेड अत्यावश्यक आहे का, असा सवाल करत, ठाणे न्यायालयाने तीन सोनसाखळी चोरांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
चोरी किंवा दरोड्याच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी आपण पकडले जाऊ नये, यासाठी ओळख लपवत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे अनोळखी आरोपींविरुद्ध दाखल केले जातात. या गुन्ह्यांमधील खरे आरोपी शोधणे हे पोलिसांसाठी कौशल्याचे काम असते. अशा प्रकरणांची उकल करण्यात तपास अधिकारी क्वचित यशस्वी होतात, असे निरीक्षण ठाणे न्यायालयाने नोंदविले. राबोडी पोलीस ठाण्यातील एका सोनसाखळीच्या खटल्यामध्ये फिर्यादी महिलेने आरोपींना ओळखले नाही. बचाव पक्षाने हा मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित करून आरोपींना संशयाचा फायदा देण्याची विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्वाळ्याचा दाखला देत, न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही.
भारतीय पुरावे कायद्याचे कलम ११४ अन्वये एखाद्या प्रकरणामध्ये न्यायसंगत तर्क लावण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत. एखाद्या व्यक्तीकडे दोन-तीन दागिने सापडल्यास ते त्याचे अथवा त्याच्या पत्नीचे आहेत, असे समजण्यास हरकत नाही. मात्र, आरोपींकडे मोठ्या प्रमाणात दागिने सापडले असून, त्याबाबत आरोपी स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत केवळ ओळख परेड होऊ शकली नाही, म्हणून आरोपींना संशयाचा फायदा देता येणार नाही, असे न्यायालयाने निकालामध्ये स्पष्ट
केले आहे.
>तपासातील त्रुटींचा आरोपींना फायदा नाही
सोनसाखळी चोरीतील तिन्ही आरोपी कल्याणजवळच्या आंबिवली येथील आहेत. पोलिसांनी आरोपींचा जबाब दुपारी ११.४५ वाजता नोंदविला. त्याच दिवशी दुपारी १२ ते ५ वाजताच्या दरम्यान तिन्ही आरोपींच्या आंबिवली येथील घरांमधून चोरीचे दागिने हस्तगत केल्याचे पोलिसांच्या दस्तावेजातून दिसते. अवघ्या १५ मिनिटांत पोलीस ठाण्याहून आंबिवली येथे कसे पोहोचले, असा युक्तिवाद करून, बचाव पक्षाने वेळोवेळी या मुद्द्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. या मुद्द्यावर तपास अधिकाºयाची चूक स्पष्टपणे दिसते. मात्र, सरकार पक्षाने आरोपींचा गुन्हा ठोस पद्धतीने सिद्ध केल्याचे स्पष्ट करून, तपासातील अशा त्रुटींचा फायदा नेहमीच आरोपींना देता येणार नाही, असे स्पष्ट निरीक्षणही न्यायालयाने या वेळी नोंदविले.
>सोनसाखळी चोरांना सश्रम कारावास
महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र खेचून नेणाºया कल्याणच्या तीन चोरांना ठाणे न्यायालयाने २३ फेब्रुवारीला
२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मो. अफसर सय्यद (३३), अजिज हाफीज सय्यद (३३) आणि मुख्तार शेरू हुसेन उर्फ इराणी (२५) ही या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. तिघेही कल्याणमधील आंबिवली येथील रहिवासी आहेत.११ सप्टेंबर २०१४ला प्रज्ञा राजपूत नावाची महिला मैत्रीण कामिनी खैरनारसोबत पायी जात असताना, मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. प्रज्ञा राजपूत यांनी मंगळसूत्र पूर्ण ताकदीनिशी पकडून ठेवले. त्यामुळे मंगळसूत्र तुटून अर्धे आरोपींच्या आणि अर्धे प्रज्ञा यांच्या हातात राहिले. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांनी या प्रकरणाचा तपास केला. दरम्यान, गुन्हे अन्वेषण शाखेला कार्यरत असताना, तपास अधिकारी भुजबळ यांनी ३१ जानेवारी २०१६ला तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून सोन्याचे ३२ दागिने पोलिसांनी हस्तगत केले. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने तिन्ही आरोपींना २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी जवळपास दीड वर्षापासून तुरुंगात होते. तो कालावधी शिक्षेतून वगळण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले.

Web Title: The identity parade of the accused is not required for each offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे