पुस्तकांमधून मिळणारे वैचारिक साहित्य दीर्घकाळ टिकणारे असते – डॉ. नितीन करीर
By प्रज्ञा म्हात्रे | Published: February 15, 2024 07:33 PM2024-02-15T19:33:39+5:302024-02-15T19:34:56+5:30
'विचारमंथन' व्याख्यानमाला वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित 'वाचन आणि मी' या विषयावरील १३ वे पुष्प संपन्न झाले.
ठाणे : इंटरनेट हे जरी सर्वांसाठी खुले असले तरी त्याचा वापर हा क्षणिक असतो, मात्र वाचन हे क्षणिक नसते, पुस्तकांच्या माध्यमातून मिळणारे वैचारिक साहित्य हे दीर्घकाळ टिकणारे असते. सामाजिक जीवनात वावरत असताना पुस्तके आणि वाचन हे खूप महत्वाचे आहे. पुस्तकांमधून आपण केवळ शिकतो किंवा आपले मनोरंजन होतेच असे नाही तर आपला जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि तो महत्वाचा असल्याचे मत राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी व्यक्त केले.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'विचारमंथन' व्याख्यानमाला वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित 'वाचन आणि मी' या विषयावरील १३ वे पुष्प संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. करीर म्हणाले की, पुस्तकाचे वाचन सैरभैर असायला हवे, ते एकांगी असू शकत नाही. अवांतर वाचनाचे महत्व हे सर्वांनी जाणून घ्यायला हवे. कुठल्याही कलेचा आनंद मग संगीत असो की वाचन ते अवांतर असायला हवे. पुस्तकांचे वेगवेगळे जॉनर आहेत, यापैकी कुठलेतरी एक जॉनर आपल्याशी बोलत असते. कुठल्या प्रकारची पुस्तके आपल्याशी बोलतात आणि हा पुस्तकांचा प्रवासच इतका छान असतो आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो. पुस्तके सतत आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतात फक्त आपली ऐकण्याची तयारी असली पाहिजे. वाचन आणि मी यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर म्हणाले की, माझे वाचन हे एका दिशेने कधीच नव्हते.. जशी दिशा मिळेल तसं वाचत आलो असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. शैलजा राजे, कुसुम अभ्यंकर, ज्योत्सना देवधर या लेखिकांची पुस्तके वाचण्यास सुरूवात केली. त्यानंतर सांगलीला महाविद्यालयात आल्यानंतर जी.ए ची पुस्तके वाचली. प्रत्येक टप्प्यावर जेव्हा मी जात होतो तेव्हा वाचनांचा परिणाम थेट जाणवत होता.
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना मुक्तपणे पुस्तके हाताळण्यास संधी मिळावी यासाठी महापालिकेच्या शाळेत सुरू केलेला 'वाचन कोपरा' हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. शाळेच्या मुलांसाठी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल राज्याचे मुख्य सचिव डॉ. करीर व ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांचे कौतुक केले. आयुक्त बांगर यांनी मान्यवरांचे ग्रंथबुके व चित्रप्रतिमा देवून त्यांचे स्वागत केले.