गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ मठात मूर्ती पूजन; सोशल मीडियातून भक्तांचा आवाहनाला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 09:14 AM2020-07-05T09:14:59+5:302020-07-05T09:15:20+5:30
कोणतीही गर्दी न करता मंदिर प्रशासनातील निवडक पदाधिकारी आणि सेवेकऱ्यांनी दोन्ही मठात स्वामींचा जयजयकार करत पूजन केले.
अनिकेत घमंडी,
डोंबिवली: लॉकडाऊन असले तरीही परंपरेप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील श्रीस्वामी समर्थ मठ, नंदिवली, तसेच श्रीगोविंदांनंद श्रीराम मंदिर या दोन्ही ठिकणी मंदिर, मठ प्रशासनाने मूर्ती, फोटोचे पूजन केले. श्रीस्वामी समर्थ सेवा मंडळाकडे स्वामींच्या निर्गुण पादुका असून त्याचेही विधिवत पूजन करण्यात आले. कोणतीही गर्दी न करता मंदिर प्रशासनातील निवडक पदाधिकारी आणि सेवेकऱ्यांनी दोन्ही मठात स्वामींचा जयजयकार करत पूजन केले.
मंदिर, मठ भक्तांसाठी उघडे नसून राज्य, केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले. येथील श्रीराम मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या भक्त मंडळींना सहज दर्शन होईल अशा पद्धतीने मंडळाने उघडे ठेवले आहे. परिसरातील भक्त, पोलीस मंडळी, राज्य शासनाचे कर्मचारी त्यांच्या वेळेनुसार बाहेरून रस्त्यावरून दर्शन घेऊन समाधान व्यक्त करत असल्याचे निदर्शनास आले.
दिवसभर मंडळाच्या वतीने भक्तांना घरीच स्वामी पूजन, पद्यपूजन, मानसपूजा करण्यास आणि ज्यांना गुरुमंत्र असेल त्यानी गुरुमंत्र अथवा अन्य भक्तांनी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे. मंडळाचे संस्थापक कै. भालचंद्र उपाख्य अण्णा लिमये यांच्या प्रतिमेला हार घालून त्यांच्या स्मृती दृक्श्राव्य स्वरूपात भक्तांना एकवण्यात येणारं आहेत. अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वामींसमवेत गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा मंडळाने संकल्प।सोडला असून त्या पहिल्या सत्रातील उपक्रम पूर्ण झाले असून समाजमाध्यमांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.