टोलमुक्तीबाबत निर्णय झाला नाही तर ‘खळ्ळखट्याक’! राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 08:56 AM2023-10-09T08:56:56+5:302023-10-09T08:59:26+5:30
सकारात्मक निर्णय झाला नाही तर गांधीवादी मार्गाने नव्हे तर ‘मनसे स्टाइल’ने आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ठाणे : टोल बंद करण्यासाठी ‘मनसे’ने आतापर्यंत अनेक आंदोलने करून अधिकृत आणि अनधिकृत असे ६७ टोलनाके बंद केले. शिवसेना भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. टोलवाढीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यानंतरही सकारात्मक निर्णय झाला नाही तर गांधीवादी मार्गाने नव्हे तर ‘मनसे स्टाइल’ने आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्याबाबतची भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचे ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.
टोल दरवाढीविरोधात मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे मुलुंड टोलनाका येथे आमरण उपोषणाला बसले होते. रविवारी सकाळी राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जाधव यांच्यासह आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
ठाकरे म्हणाले की, शिवसेना भाजपच्या जाहीरनाम्यात टोलनाके बंद करू, असे आश्वासन दिले होते. २०१४ आणि २०१७ला सुद्धा त्यांनी हे सांगितले होते, पण आम्हाला टोलनाक्याचे काय झाले, हे विचारले जाते. घोषणा करणाऱ्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. एमएसआरडीसीच्या मोपलवारांशी बोलणे झाले, २००२ मध्ये ॲग्रीमेंट झाले. त्यावर पैसे उचलल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर जाधव यांच्यासह ओवळा माजिवडा उपशहरप्रमुख पुष्कर विचारे यांनीही उपोषणाची सांगता केली. मनसेचे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे, आमदार राजू पाटील, रवींद्र मोरे यासह बहुसंख्येने मनसैनिक उपस्थित हाेते.
रहिवाशांनी घेतली भेट
लोढा, हिरानंदानी कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनीही टोलमुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
राज यांनी उपस्थित केलेले प्रश्न
- रस्ते व्यवस्थित बांधले जात नसतील तर टोल कशाला भरायचा ? टोल नाक्यावरून किती वाहने जातात आणि किती टोल जमा होतो, त्या रकमेचे काय होते?
- शिवसेना भाजपने जाहीरनाम्यात टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले?
- ठाण्यातील सर्व पाच टोलनाके म्हैसकर यांचे आहेत. कोण म्हैसकर यांचे लाडके आहेत?
- एकनाथ शिंदे यांनी टोलसंदर्भात याचिका का मागे घेतली?