...तर कसाऱ्याचे होईल माळीण, दरड कोसळल्याने घराचे झाले नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:40 AM2019-07-14T00:40:29+5:302019-07-14T00:40:32+5:30
कसारा गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून परिसरातील आनंदनगर, पंचशीलनगर, देऊळवाडी, निंगडवाडी, ठाकूरवाडी, कोळीपाडा, तानाजीनगर या ठिकाणी डोंगर पोखरून नव्याने घरे उभी राहिली आहेत.
कसारा : कसारा गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून परिसरातील आनंदनगर, पंचशीलनगर, देऊळवाडी, निंगडवाडी, ठाकूरवाडी, कोळीपाडा, तानाजीनगर या ठिकाणी डोंगर पोखरून नव्याने घरे उभी राहिली आहेत. डोंगर कमकुवत झाल्याने भविष्यात अतिवृष्टीमुळे कसाºयाचे माळीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहापूर तालुक्यातील मोखावणे-कसारा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या पंचशीलनगर येथील सुनील शिंदे यांच्या घरावर शुक्रवारी दरड कोसळल्याने संपूर्ण घराचे नुकसान झाले. घरातील सर्वजण वेळेत बाहेर पळाले म्हणून वाचले.
सतत कोसळणाºया पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात व रेल्वे घाटात दरड कोसळल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी सकाळी पंचशीलनगर येथील शिंदे यांच्या घरावर दरड व मातीचा मलबा कोसळल्याने त्यांच्या घरातील सर्व वस्तू मातीखाली गाडल्या गेल्याने शिंदे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. घरातील गॅस, अन्नधान्य, शालेय साहित्य, लॅपटॉपसह महत्त्वाच्या वस्तूंची नासधूस झाली आहे. या घटनेची दखल घेत तहसीलदार रवींद्र बावीस्कर यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. हा अहवाल सरकारकडे पाठवला.
तहसीलदार बावीस्कर यांनी वनजमिनीवर उभ्या राहिलेल्या धोकादायक घरांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती दिली. कसारा-मोखावणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत मार्केयांनी अतिक्र मण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, कसाºयाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी नियोजनाचा अभाव आहे. यामुळे प्रशासनाने नियोजन करावे अशी मागणी होत आहे.
>कसारा परिसरातील काही ठिकाणी भूस्खलन होऊन डोंगर खचत थेट घरावर पडत आहेत. अजून मोठ्या प्रमाणावर डोंगर खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. महसूल विभागाकडून धोकादायक घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या असून वनविभागाशी पत्रव्यवहार केला आहे.
- रवींद्र बावीस्कर, तहसीलदार
घरावर जेव्हा दोन दगड पडले, तेव्हा माझ्या मुलाने मला सांगितले की, घरावर कोणीतरी दगड फेकतोय. तेव्हा पाऊस पडत होता. मी घरामागे बघितले, तर माती खाली येत होती. क्षणाचा विलंब न लावता मी घरातील सर्व मंडळींना घराबाहेर काढले व काही समजण्याअगोदर घरावर दरड कोसळली.
- सुनील शिंदे, पीडित