कुल्हड सात रुपये तर चहा विकावा लागताे पाच रुपयात, समीकरण जुळवायचे कसे? कॅण्टीनचालकांपुढे पेच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 11:33 PM2020-12-05T23:33:52+5:302020-12-05T23:35:20+5:30
Tea News : रेल्वे मंत्रालय, दिल्ली बोर्डच्या सूचनेनुसार रेल्वे स्थानकांतील कॅण्टीनमध्ये चहासाठी कुल्हडचा वापर तातडीने सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.
- अनिकेत घमंडी
डाेंबिवली - रेल्वे मंत्रालय, दिल्ली बोर्डच्या सूचनेनुसार रेल्वे स्थानकांतील कॅण्टीनमध्ये चहासाठी कुल्हडचा वापर तातडीने सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. मात्र, मुंबई विभागात कुल्हड प्रति नग सात रुपयांना मिळत आहे. तर, कॅण्टीनमध्ये प्रति कप चहा पाच रुपयांना विकला जातो. त्यामुळे ते समीकरण कसे जुळवायचे? असा पेच कॅण्टीनचालकांपुढे आहे.
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, दादर, एलटीटी, कुर्ला, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, कसारा, इगतपुरी या स्थानकांमध्ये कुल्हडमधून चहा मिळत असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या कोविडमुळे सर्वच कॅण्टीनमध्ये चहा मिळतोय असेही नाही, तसेच जेथे मिळतोय तेथे ग्राहकांना मागणीनुसार कुल्हड मिळताे.
ठाणे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल थांबतात त्या फलाटावर कोरोनापूर्वी दिवसाला सुमारे ३०० कप चहाची विक्री होत होती. आता दिवसाला केवळ ३० ते ४० कपच चहा विक्री होत आहे अशी माहिती देण्यात आली. त्यातही काही प्रवासी कुल्हड मागत नाहीत, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.
जिल्ह्यात कोठून येते कुल्हड ?
ठाण्यात जांभळीनाका, वाशीहून कुल्हड मागविण्यात येत आहेत. प्रतिनग सात रुपयांना ते पडते. किमान १०० नग खरेदी करावे लागतात. त्यातही ते तुटले तर कॅण्टीनचालकांच्या अंगावर पडते. आधीच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यात कुल्हडमुळे होणारा कचरा जास्त व वजनदार होणार असल्याने त्याची विल्हेवाट कशी लावायची? हाही प्रश्नच आहे.
चहाचा दर वाढवा!
रेल्वे प्रशासनाचा चहासाठी कुल्हडचा प्रयोग पर्यावरणीय दृष्टीने चांगला आहे, पण मुंबई परिसरात ते सहज उपलब्ध हाेत नाहीत. चहाची किंमत वाढवून दिल्यास व्यवसाय करणे सोपे जाईल.
- विजय सिंघल, कॅण्टीन मॅनेजर
कागदी कप याेग्य पर्याय
कुल्हड महाग पडतो. आतापर्यंत प्रत्येक वेळेला १०० नग खरेदी केले आहेत. कुल्हडची किंमत व चहाविक्रीचा दर, हे समीकरण जुळविताना नाकीनऊ येत असून ‘कागदी कप’ हा चांगला पर्याय आहे.
- मनाेज अगरवाल, कॅण्टीन मॅनेजर