दहीहंडी लावल्यास कारवाईचा उगारणार बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:59+5:302021-08-28T04:44:59+5:30
ठाणे : कोरोनाचे नियम पाळून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या मनसेला दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई करणारा ...
ठाणे : कोरोनाचे नियम पाळून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या मनसेला दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई करणारा आदेश ठाणे पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी बजावला.
दहीहंडी मंडळांनी उत्सव साजरा करू नये. नियम धुडकावून जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्यास साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा नौपाडा पोलिसांनी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांना नोटिसीद्वारे शुक्रवारी दिला.
नियम पाळत दहीहंडी साजरी करणार असल्याचे मनसेचे मोरे यांनी जाहीर केले आहे. जी दहीहंडी मंडळे स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असतील, त्या मंडळांनी दिलेल्या वेळेनुसार येऊन थर लावावेत, असे आवाहनही मोरे यांनी केले आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोविंदा पथकांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन, कोरोनाचा प्रसार होईल, असे सण, उत्सव साजरे करू नका, असे आवाहन गोविंदा पथकांना केले. जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सणवार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवून मानवता दाखवू आणि कोरोनाला हद्दपार करू, असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश लागू केला. या आदेशाचे पालन न केल्यास, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास कलम १८८ आणि साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस नौपाडा पोलिसांनी मनसेला बजावली आहे.
....................
‘‘हिंदू धर्मियांच्याच सणांवर निर्बंध कशासाठी लादले जात आहेत? आम्ही कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या गोविंदांनाच दहीहंडीसाठी प्रवेश देणार आहोत. शिवाय, इतरही नियमांचे पालन केले जाणार आहे. नऊ थर लावणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे.’’
- रवींद्र मोरे, शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठाणे
..........