... तर दिवाळीतील लाडू होणार कडू , ७ वर्षांपासूनच्या मागण्या प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:32 AM2017-10-04T01:32:18+5:302017-10-04T01:33:17+5:30
जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-यांच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर झालेल्या नाहीत.
ठाणे : जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-यांच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर झालेल्या नाहीत. यामुळे संतापलेल्या या कर्मचा-यांनी अखेर मंगळवारी सकाळपासून राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या या आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांवर सणासुदीच्या अन्नधान्यांसह साखर, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार नाही. यामुळे दिवाळीचा लाडू मात्र कडू होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
या आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील सुमारे २०० कर्मचाºयांचा समावेश असल्याचे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेचे सरचिटणीस कापडे यांनी लोकमतला सांगितले. या कामबंद आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास दिवाळी सणानिमित्त जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील सुमारे ५९३ शिधावाटप दुकानांवर सणासुदीचे अन्नधान्य, गोडे तेल, साखर, डाळी आदींचा पुरवठा अजिबात होणार नाही. परिणामी सुमारे लाखो ग्रामस्थ, आदिवासी कुटुंबिय दिवाळीत लाडू सारख्या गोडधड पदार्थापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
जिल्हास्तरीय पुरवठा विभागाचे वर्ग तीन व वर्ग चार श्रेणीच्या कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. बेमुदत कामबंद आंदोलना दरम्यान कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. मात्र, ते कोणत्याही प्रकारचे काम करणार नाहीत. त्यांच्या या असहकारमुळे ग्रामीण कुटुंबियाना जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवणार आहे. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. तहसीलदारांच्या नियंत्रणातील पुरवठा कर्मचारी देखील या आंदोलनात आहेत.
या आंदोलनापाठोपाठ १० आॅक्टोबरपासून महसूल कर्मचारी देखीलबेमुदत आंदोलन छेडणार आहेत. ऐन दिवाळीत राज्यभर होणाºया या आंदोलनादरम्यान अन्नधान्याच्या पुरवठा व शासकीय कामांना खीळ बसणार आहे.