फडणवीस काडतूस, तर आमच्याकडे ठाकरी तोफ; सुषमा अंधारे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 09:14 AM2023-04-06T09:14:03+5:302023-04-06T09:14:19+5:30

जनप्रक्षोभ मोर्चात ठाकरे गटाच्या नेतेमंडळींकडून सरकारचा समाचार

If Devendra Fadnavis is Cartridge then We Have Canon like Uddhav Thackeray says Sushma Andhare | फडणवीस काडतूस, तर आमच्याकडे ठाकरी तोफ; सुषमा अंधारे यांची टीका

फडणवीस काडतूस, तर आमच्याकडे ठाकरी तोफ; सुषमा अंधारे यांची टीका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : देवेंद्र फडणवीस जर तुम्ही काडतुसाची भाषा केली असेल, तर उद्धव ठाकरे हे तोफ आहेत. तोफेपुढे काडतुसाचा निभाव लागत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. तसेच इथला शिवसैनिक छातीचा कोट करून उभा आहे, काय गुन्हे टाकायचेत ते टाका, काय करायचे ते करा, असे म्हणत ‘सरफरोशी की तम्मन्ना अब हमारे दिल मे है...’ असा शेर त्यांनी मारला.

उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतरही गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ ठाण्यात महाविकास आघाडीचा ‘जनप्रक्षोभ मोर्चा’ काढण्यात आला होता. यानंतर शक्तिस्थळावर झालेल्या सभेत सुषमा अंधारे बोलत होत्या. अंधारे यांनी पुढे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समाचार घेतला. उद्धव ठाकरेंना मातोश्रीतून बाहेर पडू देणार नाही, असे बावनकुळे म्हणतात. पण, बावनकुळे यांना ‘तुमची उमेदवारी का वाचवता आली नाही,’ असा खोचक सवालही केला. हिंमत असेल तर ४८ तासांच्या आत मातोश्रीवर या, असे आव्हानही केले. महिलेला लाथाबुक्क्यांनी  मारण्यासाठी गृहमंत्र्यांनी परमिट दिले आहे का, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, ठाकरे गटापासूनच रोशनी शिंदे यांच्या जीवाला धोका असून  त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी करणारे पत्र ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहे.

रोशनी आई होऊ नये, याकरिता मारहाण

रोशनी शिंदेच्या सर्व पोस्ट वाचल्या, तिने टाकलेल्या पोस्ट या शिवसेनेच्या संस्कारातल्या होत्या. तिच्या पोस्टमध्ये एकही आक्षेपार्ह शब्द नाही, असा निर्वाळा देत आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ती आई होऊ नये म्हणून तिच्या पोटावर मारले, एका स्त्रीला आई होण्यापासून रोखणे हे सर्वांत मोठे पाप आहे. तुमच्या या पापाची दखल ३७ नाही ६७ देशांनी घेतल्याची टीका त्यांनी केली.

आहेर यांच्या पदव्या खोट्या, आव्हाडांचा दावा

  • पालिकेतील अधिकारी महेश आहेर, यांची १२ वीची उत्तर प्रदेश आणि सिक्कीमची पदवी दाखवत त्यांनी या पदव्या खोट्या असल्याचे सांगितले. एखादी व्यक्ती माझ्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करीत असेल तर कार्यकर्त्यांना राग येणारच, त्यातून त्यांनी मारहाण केली. 
  • आता चौकशीसाठी पोलिसांना बोलावून घेतले जाते. तासन् तास बसवून ठेवले जाते व जितेंद्र आव्हाड यांचे नाव घ्या, असा दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. वामन म्हात्रे व बाळा मामा यांच्यावर दबाव टाकल्यानेच त्यांनी पक्ष सोडल्याचे आव्हाड म्हणाले. अशा पद्धतीने दबाव टाकून पक्ष निर्माण करता येत नाही, असेही आव्हाड म्हणाले.

Web Title: If Devendra Fadnavis is Cartridge then We Have Canon like Uddhav Thackeray says Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.