नाटकांना गर्दी असेल तर ते प्रयोग चांगले रंगतात - रवी पटवर्धन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 04:39 PM2017-10-01T16:39:58+5:302017-10-01T16:40:08+5:30
नाटकांचे प्रयोग किती होतात यापेक्षा प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या दादमुळे कलाकारांचा आनंद द्विगुणित होत असतो.
ठाणे : नाटकांचे प्रयोग किती होतात यापेक्षा प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या दादमुळे कलाकारांचा आनंद द्विगुणित होत असतो. नाटकांना गर्दी असेल तर ते प्रयोग चांगले रंगतात, कारण त्यात प्रेक्षकांचा सहभाग असतो, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांनी व्यक्त केल्या.
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, सह आयुक्त समाज कल्याण, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त रविवारी ज्ञानसाधना महाविद्यालय येथे पटवर्धन यांची मुलाखत पार पडली.
सुवर्णा जोशी यांनी मुलाखत घेतली. प्रेक्षकांनीही त्यांना प्रश्न विचारले. आपल्या नाट्य क्षेत्रातील आठवणी त्यांनी प्रेक्षकांसमोर कथन केल्या. चांगली नाटक ही चालतात पण ती कधी कधी खूप चालतात असेही नसते हे सांगताना ते म्हणाले की, मी 100 नाटक केलीत, बऱ्याच नाटकांचे 200, 500 असे प्रयोगही झालेक. ज्येष्ठाना तुम्ही काय सल्ला द्याल या प्रश्नाला उत्तर देताना पटवर्धन म्हणाले की, ज्येष्ठांनी ज्येष्ठ न राहता तरुण व्हावे आणि ते शक्य ही आहे. कधीही रिटायर्ड होऊ नये, आपल्याला आवडेल ते काम करावे. टीव्ही जास्त पाहू नये, टीव्ही माणसाला बसवून ठेवतो.
शेवटपर्यंत काम करत राहा. मृत्यूची भीती न बाळगता त्याला जीवलग मित्र माना. शेवटी गडकरी यांच्या एकच प्याला नाटकतील स्वागत सादर केले, यावेळी उपस्थित ज्येष्ठांनी टाळ्यांची दाद दिली. कार्यक्रमाला ज्ञानसाधना समाज कल्याण अधिकारी डी. ए. रासम, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्रा. श्रीरंग कुडुक, ज्येष्ठ चित्रकार कुमुद डोके, कशिश पार्क ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थाचे बलराम नाईक उपस्थित होते.