'पुन्हा खोटे गुन्हे दाखल केल्यास...'; मनसेच्या अविनाश जाधवांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 05:01 PM2020-09-03T17:01:15+5:302020-09-03T17:02:31+5:30
जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचे कौतुक करायलाही आम्ही मागे हटणार नाही, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.
ठाणे : विरार येथील महानगरपालिका मुख्यालयात घातलेल्या राड्याप्रकरणी विरार पोलिसांकडून अविनाश जाधव यांना तडिपारीची नोटीस बजावण्यात आली होती. यावर जाधव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.
माझ्यावर ज्या अधिकाऱ्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात केस दाखल केली आहे. जे जे अधिकारी चुकतील त्यांच्याविरोधात असेच गुन्हे दाखल करणार. परंतु जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचे कौतुक करायलाही आम्ही मागे हटणार नाही, अशा शब्दांत सुनावले आहे. जिथे मनपा अधिकारी चुकतील तिथे मनसे आंदोलनाआधी गुन्हा दाखल करेल, असा इशाराच ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे.
कोविडदरम्यान काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना घरी बसविल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अविनाश जाधव यांच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना ठाणे पालिका मुख्यल्यासामोर पोलिसांनी अटक केली. अविनाश जाधव यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे सेशन न्यायालयात जामीन अर्ज केला होता. त्या अर्जावर 6 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र कापूरबावडी पोलिसांनी अतिवृष्टीचे करण पुढे करत तसेच पोलीस रिपोर्ट न्यायालयात सादर न केल्याने न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली होती.
यानंतर ठाणे सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी करताना सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर पोलिसांच्या वतीने जाधव यांची चौकाशीसाठी आणखीन वेळ पाहिजे होता असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने पोलिसांची विनंती फेटाळली. त्यानंतर सरकारी वकील आणि अविनाश जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांचा युक्तीवाद झाला. अविनाश जाधव यांच्यावर असलेल्या गुन्हयांवर युक्तीवाद करण्यात आला. जाधव यांना जामीन दिल्यास पुन्हा आशा प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केलेला. तर अविनाश जाधव यांच्यावर दाखल असलेले गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे आहेत. इतर कुठलाही गंभीर गुन्हा नसल्याचे राजूरकर यांनी न्यायालयात मांडले. अखेर न्यायालयाने अविनाश जाधव यांना जामीन मंजूर करण्यात आला.