उड्डाणपुलाचे काम न झाल्यास अवमान याचिका दाखल करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:57 AM2019-12-22T00:57:25+5:302019-12-22T00:58:14+5:30
सुरळके यांचा इशारा । ४२ गावांना होणार फायदा
शहापूर : केंद्र व राज्य सरकारने डिसेंबरअखेर वासिंद येथील ४२ गावांना जोडणारा उड्डाणपूल बांधणार, असे प्रतिज्ञापत्र दिलेले असतानाही सरकारच्या उदासीनतेमुळे पुलाचे काम पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण, पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. यासंदर्भात याचिकाकर्ते संजय सुरळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालानुसार मार्चअखेरपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या ४० वर्षांपासून वासिंद व परिसरातील ४२ गावांतील हजारो ग्रामस्थांचा वासिंद रेल्वे उड्डाणपूल व पावसाळ्यात जाचक ठरणाऱ्या भुयारी मार्गाबाबत उच्च न्यायालयाने नुकताच अंतिम निकाल जाहीर केला होता. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदरजोग व न्यायमूर्ती नितीन जामदार यांनी निकालपत्रामध्ये याचिकाकर्ते सुरळके यांनी या नागरी समस्यांच्या बाबतीत गंभीरपणे मांडलेल्या वासिंद रेल्वे बोगदा व बंद रेल्वे गेटचे विश्लेषण केले. तसेच न्यायमूर्ती अभय ओक यांच्या समितीने भेट देऊन पाहणी अहवाल सादर केला होता.
सरकारी दिरंगाईबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. सलग दोन वर्षे उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर केली जात होती. केंद्र व राज्य सरकारने डिसेंबरअखेर पूल बांधण्याचे शपथपत्र दिले होते. या चालू आर्थिक वर्षाअखेर उड्डाणपुलाचे बांधकाम शक्य तितक्या लवकर पूर्ण झाले पाहिजे, असे आदेश दिले आहेत. मात्र, पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सुरळके हे स्वत: या दिरंगाईच्या निषेधार्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. उड्डाणपूल झाल्यास ४२ गावांतील ग्रामस्थांची दैना थांबणार आहे.