गॅसबाबत चुकीची हमीपत्रे आढळल्यास कारवाई, ई पॉस मशीनद्वारे वितरण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 04:17 PM2018-11-14T16:17:10+5:302018-11-14T16:17:17+5:30
५९० रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून अन्नधान्याचे ८८ टक्के वाटप ई पॉस मशीनच्या माध्यमातून ऑनलाइन होत असून त्यामुळे संपूर्ण यंत्रणेत पारदर्शीपणा आणि वेग आला आहे.
ठाणे : जिल्ह्यात ५९० रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून अन्नधान्याचे ८८ टक्के वाटप ई पॉस मशीनच्या माध्यमातून ऑनलाइन होत असून त्यामुळे संपूर्ण यंत्रणेत पारदर्शीपणा आणि वेग आला आहे. अनावश्यक लाभार्थी कमी झाल्याने धान्याची बचतही झालेली आहे. यावर्षी ऑगस्टपासून ई पॉसद्वारे केरोसीन विक्रीही करण्यात येत असून, शिधापत्रिकाधारकांकडून गॅस नाही अशी हमी पत्रे घेण्यात येत आहेत. चुकीची हमीपत्रे आढळल्यास कार्डधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात एकुण केरोसीनचे पात्र कार्डधारक 1 लाख 38हजार 953 असून पॉसद्वारे विक्री सुरू झाल्यानंतर 72 कि.लि. केरोसिनची गरज कमी झाली आहे. रास्त भाव दुकानांच्या मार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजेनच्या लाभार्थ्यांस धान्य वाटप करण्यात येते. अंत्योदय योजनेच्या मुरबाड-10959, शहापूर-17617, भिवंडी-11449, कल्याण- 2425, अंबरनाथ-3674 अशा एकुण 46 हजार 174 इतक्या शिधापत्रीका आहेत. तर प्राधान्य कुटुंब योजनेचे मुरबाड-16868, शहापूर-28014, भिवंडी-28571, कल्याण-12572, अंबरनाथ-7600 असे एकूण 93 हजार 625 शिधापत्रिका आहेत. अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या मिळून एकूण 1 लाख 39 हजार 799 शिधापत्रिका आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे यांच्या कार्यक्षेत्रात मुरबाड तालुक्यात 196, शहापूर-165, भिवंडी-157, कल्याण-42, अंबरनाथ-31 अशी एकुण 591 इतकी रास्त भाव धान्य दुकाने आहेत. ऑक्टोबर 2018 मध्ये 121525 (88.42 %) कार्डधारकांस पॉसद्वारे आधारबेस धान्य वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे पॉसमध्ये नाव नोंदणी झालेली नसल्याने त्यांना ऑफलाइन वाटप करण्यात येत आहे. या महिन्यात 100% शिधापत्रिकांचे संगणकीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.