Maharashtra election 2019 : सत्ता दिली, तर जाब पण विचारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 06:15 AM2019-10-16T06:15:26+5:302019-10-16T06:46:59+5:30
राज ठाकरेंचे आवाहन : विकासाच्या मुद्द्यावर सरकारवर घणाघाती टीका
डोंबिवली : स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींच्या पॅकेजची निव्वळ आकडेमोड करणारे सरकार लोकांना पाणी, आरोग्यासारख्या मूलभूत सुविधाही देऊ शकले नाही. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून, त्यामुळे लोकांचे नाहक बळी जात आहेत. सर्वत्र अत्यंत विदारक परिस्थिती असतानाही ज्याला बहुमताची सत्ता दिली, त्या सरकारला आपण जाब का विचारत नाही, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील जाहीर सभेत मंगळवारी केला. मतदारांना जागरूक होण्याचे आवाहन करतानाच, त्यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीकाही केली.
डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानात मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील आणि डोंबिवलीचे उमेदवार मंदार हळबे यांची प्रचारसभा मंगळवारी सायंकाळी पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. डोंबिवली हा संघाचा बालेकिल्ला समजला जातो. मग, डोंबिवलीच्या बकाल अवस्थेबाबत भाजपच्या कामगिरीचे संघ का मूल्यमापन करत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. डोंबिवली हे सुशिक्षित लोकांचे बकाल शहर झाले आहे. या शहरातून चार्टर्ड अकाउंटंट होणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांनी शहराच्या परिस्थितीचे आॅडिट करावे. ६५०० कोटींच्या पॅकेजची घोषणा करणाºया सरकारला या शहरातील साधे खड्डेही बुजवता आले नाही. खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या लोकांची यादी वाचून दाखवताना, लोकांना या भीषण परिस्थितीचा संताप का येत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला. राज्यात सव्वा लाख विहिरी बांधल्याचा दावा सरकारकडून केला जातो. कदाचित, हा आकडा खड्ड्यांचा असावा, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला.
१४ वर्षे राम वनवासात होते. या काळात सेतू बांधण्यापासून कितीतरी मोठी कामं त्यांनी केली. इथे फक्त सी-लिंक बांधायला १४ वर्षे लागल्याचा चिमटाही त्यांनी सरकारला घेतला. महाराष्ट्राची अवस्था एवढी वाईट झाली आहे की, उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांतून येणारी मंडळीही महाराष्ट्राची तुलना त्यांच्या राज्यांशी करू लागली आहेत. हे चित्र बदलण्यासाठी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता असल्याचे सांगून, त्यांनी मनसेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.