दि.बां.च्या नावाला नकार दिल्यास ‘त्या’ आंदोलनासारखी परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:34+5:302021-06-16T04:52:34+5:30
कल्याण : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत असताना त्याचा विचार राज्य सरकारकडून ...
कल्याण : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत असताना त्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वादाच्या वेळी जशी परिस्थिती उद्भवली होती, तशीच आता उद्भवू शकते, असा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे.
ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत १० जूनला भूमिपुत्रांनी मानवी साखळी आंदोलन केले. त्यानंतर आता सिडकोला घेराव घालण्यासाठी २४ जूनला आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी भूमिपुत्रांची बैठक झाली. त्यास भाजप नेते जगन्नाथ पाटील, खासदार कपिल पाटील, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे, रिपाइंचे अकुंश गायकवाड आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळास देण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. आतापर्यंत झालेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेत्याचे नाव दिलेले नाही. उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर वादाचा फटका तत्कालीन सरकारला बसला होता. दि. बां.चे नाव देण्याचा लढा हा मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्याचे स्वरूप धारण करू शकतो. आता संयमाने घेतले जात असले तरी पुढे संयम ठेवला जाईल, अशी अपेक्षा सरकारने आमच्याकडून ठेवू नये, असा सूर या बैठकीत व्यक्त केला गेला.
खासदार पाटील म्हणाले, या आंदोलनात जो सहभागी होईल, तोच खरा भूमिपुत्र आहे, ही भूमिका प्रत्येक भूमिपुत्रापर्यंत पोहोचविल्यास आंदोलनास व्यापक स्वरूप प्राप्त होईल. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे, त्यावेळी आमचा त्याला विरोध नव्हता. पण दि. बां.च्या नावाला त्यांचा विरोध असण्याचे कारण नाही. सिडकोने मंजूर केलेल्या ठरावानंतर सिडको आली कुठून, असा सवाल काही नेते करत असले तरी सिडकोला भूमिपुत्रांनी जागा दिली आहे, म्हणून सिडको आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांची भूमिका मांडलेली नाही. त्यांची भूमिका स्पष्ट होताच त्याचा प्रत्येक कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी होईल व त्यामुळे आंदोलन व्यापक होईल.
-----------------------