डॉक्टर नाही, तर आम्हाला किमान भगत द्या!, श्रमजीवीने केले ‘रवाळ’ आंदाेलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 10:53 AM2022-06-07T10:53:22+5:302022-06-07T10:53:58+5:30
गरीबांना उपचारांचा आधार असलेल्या मोफत उपचार देण्याचे बंधन असलेली शासकीय रुग्णालयेच व्हेंटिलेटरवर गेली आहेत.
ठाणे : ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडून पडली आहे. आरोग्य संस्था मरणपंथाला लागल्या आहेत. त्याविराेधात श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ग्रामीण भागात डॉक्टरांअभावी आराेग्य यंत्रणा कुचकामी ठरल्याने श्रमजीवी संघटनेने पारंपरिक नवीन भगत तयार करण्याचा रवाळ कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी २० भगतांचा पदवीदान कार्यक्रम करून त्यांना आरोग्य सेवेत शासनाने नियुक्त करावे, अशी मागणी करून ग्रामीण भागातील आराेग्य सेवेच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले.
गरीबांना उपचारांचा आधार असलेल्या मोफत उपचार देण्याचे बंधन असलेली शासकीय रुग्णालयेच व्हेंटिलेटरवर गेली आहेत. याबाबत श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली २४ मे रोजी ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांतील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालये यांना अचानक भेट देऊन पंचनामा केला हाेता. त्यात आराेग्यसेवेचे विदारक चित्र उघड झाले हाेते. यात तिन्ही जिल्ह्यांतील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक आणि कर्मचाऱ्यांच्या ११६८ मंजूर पदांपैकी ७१३ पदे भरलेली आहेत, तर ४५५ पदे रिक्त आहेत. ३९ टक्के पदे रिक्त असून, ६१ टक्के मनुष्यबळावरच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार सुरू असल्याचे उघड झाले हाेते.
या पार्श्वभूमीवर साेमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेने आंदोलन केले. यात मृतवत झालेल्या या आरोग्यव्यवस्थेवर उपचार म्हणून गावागावात भगत, मांत्रिकांना आरोग्य केंद्राचे प्रमुख घोषित करावे, अशी उपरोधिक मागणी करून भगतांचा पदवीदान सोहळा म्हणजेच पारंपरिक रवाळ कार्यक्रमातून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी आदिवासी कष्टकरी माणूस हाय, माणूस हाय; डॉक्टर नको, भगत द्या, अशा घोषणाही त्यांनी दिल्या.
तिन्ही जिल्ह्यांतील आराेग्य केंद्रांतील मनुष्यबळ
पद मंजूर भरलेली रिक्त
आराेग्य सहायक ५३ ३२ २१
आराेग्य सहायिका ६५ ५२ १३
आरोग्य सेवक २४१ १५४ ८७
आरोग्य सेविका २९५ २१० ८३
जीएनएम ४२ ३९ ३
औषध निर्माता ४९ ३८ ११
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ५९ ४६ १३