शक्य नसेल तर पाणीपुरवठ्याचे खासगीकरण करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:47 AM2021-09-04T04:47:51+5:302021-09-04T04:47:51+5:30

ठाणे : कळव्याला होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरून महापालिकेने एमआयडीसीकडे, तर एमआयडीसीने महापालिकेकडे बोट दाखविल्याने संतप्त झालेल्या गृहनिर्माणमंत्री ...

If not, privatize the water supply. | शक्य नसेल तर पाणीपुरवठ्याचे खासगीकरण करा..

शक्य नसेल तर पाणीपुरवठ्याचे खासगीकरण करा..

Next

ठाणे : कळव्याला होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरून महापालिकेने एमआयडीसीकडे, तर एमआयडीसीने महापालिकेकडे बोट दाखविल्याने संतप्त झालेल्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही प्राधिकरणांना खडेबोल सुनावले. त्यातही ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या असहकार्यावरून तुम्हाला काम करता येणे शक्य नसेल तर खासगीकरण करा, परंतु कळवेकरांना पाणी द्या, असे खडेबोल सुनावले.

कळव्यातील नागरिकांना गेले काही दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधीनींही आव्हाड यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर यासंदर्भात शुक्रवारी आव्हाड यांनी शासकीय विश्रामगृहात एमआयडीसी, तसेच महापालिका यांसह आणि कळवा-मुंब्रा परिसरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.

सध्या कळवा परिसराला केवळ २३ एमएलडी पाण्याच्या पुरवठा होत असून, तो अपुरा पडत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कळवासाठी ३५ एमएलडी पाणीपुरवठ्यास मान्यता असताना केवळ २३ एमएलडीच पुरवठा का केला जातो, अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली. पाणीपुरवठा कमी असल्याने कळवावासीयांना पाणीटंचाई जाणवत असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मात्र जलवाहिन्या २५ ते ३० वर्षे जुन्या असल्याने त्या वारंवार फुटत असल्याचे सांगितले. तसेच बदलापूर येथील धरणापासून कल्याण फाट्यापर्यंत लाईन जोडण्याचे काम पूर्ण होत आले असून, केवळ दीड किमीचे काम राहिले आहे. ते चार ते पाच महिन्यांत झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे ठाणे महापालिकेने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अखेर तुम्हाला शक्य नसेल तर खासगीकरण करा म्हणजे त्यातून पाणी व्यवस्थित मिळेल, त्यातून महापालिकेची वसुलीदेखील अधिक होईल असे खडेबोल सुनावले.

Web Title: If not, privatize the water supply.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.