रेशन दुकानदार धान्य देत नसेल तर दुसऱ्या दुकानाचा पर्याय खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:02 PM2020-12-29T23:02:53+5:302020-12-29T23:03:01+5:30
शिधावाटप दुकानदार दरमहा अन्नधान्य आणत नाहीत.
सुरेश लोखंडे
ठाणे : शिधावाटप दुकानदार शिधापत्रिकाधारकाला दरमहा वेळेत व नियमित अन्नधान्य, रॉकेल अन्य किरणा सामानपुरवठा कमी प्रमाणात करतात. काही धान्यपुरवठा न झाल्याचे सांगत सेवा देण्याचे टाळतात. अशा तक्रारींची दखल घेऊन शासनाने मनमानी करणाऱ्या दुकानाऐवजी आता दुसऱ्या दुकानावर अन्नधान्य घेण्याचा पर्याय (पोर्टेबिलिटी) कार्डधारकास दिला आहे. जिल्ह्यातील दोन लाख २३ हजार २८३ कार्डधारकांनी पोर्टेबिलिटीचा लाभ नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये घेतला आहे. त्यामुळे मुजोर दुकानधारकांचे धाबे दणाणले आहेत.
शिधावाटप दुकानदार दरमहा अन्नधान्य आणत नाहीत. तर काही दुकानदार धान्य, राॅकेल, साखर, तेल, डाळींचे कमी प्रमाणात वितरण करून ग्राहकास वेठीस धरतात. काही तर शासनाकडून या मालाचा पुरवठा झालेला नसल्याचे सांगून कार्डधारकास उडवून लावतात. काही दुकानदार वेळेत दुकान उघडत नाहीत. तर काही धान्य असूनही देत नसल्याच्या तक्रारी ग्राहक या दुकानदारांच्या बाबतीत ऐकवतात.
या आहेत तक्रारी
दुकानदारांकडून कार्डधारकास चांगली वागणूक दिली जात नाही, दुकान नियमित वेळेत सुरू ठेवले जात नाही, दरमहा गहू, तांदूळ डाळी आदी अन्नधान्य, राॅकेल, गोडेतेल साखरचा पुरवठा वेळेत होत नाही. काही ग्राहकांना अर्धवटच साहित्याचे वितरण करण्याची मनमानी आदी तक्रारींचा पाढा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ऐकायला मिळतो.