नियमांचे पालन केले तर पोलिसांना त्रास होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:45 AM2021-09-05T04:45:12+5:302021-09-05T04:45:12+5:30
अंबरनाथ : आगामी गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाने लागू केलेल्या नियम आणि अटीनुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे बंधन पोलिसांनी ...
अंबरनाथ : आगामी गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाने लागू केलेल्या नियम आणि अटीनुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे बंधन पोलिसांनी लादले आहे. त्याअनुषंगाने अंबरनाथमध्ये पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आढावा बैठक आयोजित केली होती.गणेशोत्सव मंडळांना त्रास देण्याची पोलीस प्रशासनाची इच्छा नसून प्रत्येकाने नियमांचे पालन केल्यास गणेशोत्सव शांततेत पार पडेल. त्यासाठी गणेशोत्सव मंडळाने सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी केले.
अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणत्या अटी आणि नियमांचे पालन करावे याबाबत शुक्रवारी पोलीस उपायुक्त यांनी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केली होती. या बैठकीत अंबरनाथ आणि बदलापुरातील दीडशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यात कोणतीही बंदी नसली तरी कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काही बंधने लादली आहेत. कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या बैठकीला अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, सहायक पोलीस आयुक्त विनायक नरळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, मधुकर भोगे यांच्यासह वीज वितरण आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन
गणेशोत्सव मंडळांना मंडपाची व इतर परवानगी घेण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी पालिकेचे अधिकारी, वीज वितरण विभागाचे अधिकारी यांनाही बोलावण्यात आले होते. गणेशोत्सव काळात मूर्ती आणताना आणि विसर्जन करताना कोणतीही मिरवणूक काढू नये याची सक्त ताकीद यावेळेस पोलीस उपायुक्तांनी दिली. तसेच ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी केले.