खलाशीच घाबरून घरात बसला तर जहाज पुढे कसे जाईल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:48 AM2021-09-07T04:48:39+5:302021-09-07T04:48:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : कोरोनाची तिसरी लाट येणार असली तरी, खलाशीच जर घाबरून घरात बसला, तर जहाज पुढे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : कोरोनाची तिसरी लाट येणार असली तरी, खलाशीच जर घाबरून घरात बसला, तर जहाज पुढे कसे जाईल? असे वक्तव्य करत आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. कोरोनाच्या लाटेशी लढायचे असेल, तर खलाशांनी बाहेर पडले पाहिजे, असा खोचक सल्लाही या वेळी पाटील यांनी दिला.
आमदार राजू पाटील हे सोमवारी अंबरनाथ शहरात आले होते. या वेळी अंबरनाथ नगरपालिकेत जाऊन नागरी प्रश्नांवर त्यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची भेट घेतली. शहरात काही दिवसांपूर्वी पालिकेने ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्या सोसायट्यांचा कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेक सोसायट्यांमधील कचरा पडून राहिला होता. याच समस्येवर चर्चा करण्यासाठी राजू पाटील यांनी मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच सोसायट्यांना त्यांची यंत्रणा उभारेपर्यंत मुदत देण्याची मागणी केली. पालिकेनेदेखील सक्षम यंत्रणा लवकर उभी करावी, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. ओला आणि सुका कचरा यावर प्रक्रिया करणारी पालिकेची कोणतीही यंत्रणा नसताना पालिकेने सोसायट्यांना कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची सक्ती करू नये. तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारेपर्यंत त्यांना मुदत द्यावी, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेबाबतचा प्रश्न विचारला असता, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.