"अडीच वर्षांपूर्वीच भाजपला साथ दिली असती तर ही वेळ आली नसती"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 05:27 AM2022-07-14T05:27:48+5:302022-07-14T05:28:44+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला.

If shiv sena had been supported bjp two and a half years ago this time would not have come said eknath shinde uddhav thackeray draupadi murmu mp support maharashtra | "अडीच वर्षांपूर्वीच भाजपला साथ दिली असती तर ही वेळ आली नसती"

"अडीच वर्षांपूर्वीच भाजपला साथ दिली असती तर ही वेळ आली नसती"

googlenewsNext

भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला पाहिजे, हीच शिवसेनेच्या सर्व खासदारांची भूमिका आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा दिला. ठाकरे यांनी आता जी भूमिका घेतली, तीच जर अडीच वर्षांपूर्वी घेतली असती तर आज आमच्यावर जी वेळ आली ती आली नसती, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असेही ते म्हणाले.

गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिंदे म्हणाले की, राज्यातील सरकार स्थिर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भातील जो प्रस्ताव दिला आहे तो योग्य नाही.  आम्हाला आता कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नसून राज्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणारी भेट ही सदिच्छा भेट असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांना वंदन करून दिघे यांचे आशीर्वाद घेतले. या दोघांच्या आशीर्वादाने युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे, या दोघांची सर्वसामान्यांना न्याय देण्याची शिकवण होती. या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, वारकरी, सर्व समाजघटकांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. 

तसेच राज्याचा विकास, प्रत्येकाला न्याय देण्याचे काम करण्यास आमचे सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका आम्ही घेतली असून त्याला आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या भूमिकेला राज्यातून प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे प्रत्येकाला वाटले पाहिजे, असेही ते म्हणाले.

शिंदे गट अधिक मजबूत
गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी आनंद आश्रम येथे उल्हासनगरचे १८ नगरसेवक, नाशिक, दिंडोरी आणि नगर येथील शिवसेना नगरसेवकांनी हजेरी लावून शिंदे यांना समर्थन दिले. त्यामुळे शिंदे गट अधिक मजबूत होत आहे. 

Web Title: If shiv sena had been supported bjp two and a half years ago this time would not have come said eknath shinde uddhav thackeray draupadi murmu mp support maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.