अभिनय कट्ट्यासारखा एखादा कट्टा पुण्यात असता तर तो नियमांतच गेला असता - सुबोध भावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:14 PM2018-10-28T13:14:37+5:302018-10-28T13:17:55+5:30
रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून ४०० व्या अभिनय कट्ट्याचा सोहळा सुरू आहे. त्यात सुबोध भावे यांनी देखील उपस्थिती लावली.
ठाणे: अभिनय कट्ट्यासारखा एखादा कट्टा दुर्दैवाने पुण्यात नाही, असा कट्टा असता तर तो नियमांतच गेला असता अशी विनोदी टिपणी करत अभिनेते सुबोध भावे यांनी पुणेकरांचे कर्तुत्व मोठे आहे अशा शब्दांत कौतुकही केले.
रविवारी सकाळी ४०० व्या अभिनय कट्ट्यावर अभिनेते सुबोध भावे यांची मुलाखत कट्ट्याचे संचालक, दिग्दर्शक किरण नाकती यांनी घेतली. नाकती यांनी त्यांच्या चित्रपचटातील प्रवासाविषयी अनेक प्रश्न विचारुन त्यांना बोलते केले. रंगमंचावर काम करण्याबरोबर पडद्यामागे काम करण्याची जबाबदारीही तितकी जास्त असते. कोणत्याही कलाकाराचा प्रवास हा संपूर्ण होत नसतो. कलाकाराचे जीवन हे शाळेतल्या पाटीसारखे असावे. त्या पाटीला पुन्हा एकदा नव्याने कोरता आले पाहिजे. मी सुबोध भावे म्हणून एक सामान्य माणूस आहे, परंतू त्या त्या भूमिकांनी मला असामान्य बनविले हे जोपर्यंत मी माझ्यात भिनवत नाही तोपर्यंत मी नव्याने भूमिका करीत नाही. कोणत्याही महापुरुषांच्या भूमिका साकारताना त्यांच्या कामाचा, व्यक्तीरेखांचा आदर केला पाहिजे. कलेप्रती कलाकारांची वृत्ती समर्पणाची असावी, आपण जेव्हा कलेशी प्रामाणिक राहतो तेव्हा ती कला आपल्याला कधी अंतर देत नाही. लोक सोडून जातात पण कला कधी सोडून जात नाही. भावे यांच्या हस्ते उद्योजक कट्टा व फॅमिली कट्ट्याच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सुरूवातीला अभिनय कट्टा संचलित दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ यावर नृत्य सादर करुन सुबोध भावे यांचे मन जिंकले. त्यानंतर कट्ट्याच्या कलाकारांनी सुबोध भावे यांच्या बालगंधर्वपासून डॉ. काशिनाथ घाणेकरपर्यंतच्या सर्व व्यक्तिरेखा साकारत त्यांचा चित्रपटातील प्रवास उलगडला. नाकती यांच्या हस्ते सुबोध भावे यांना अभिनय कट्टा गौरव पुरस्कार २०१८ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.